थँक यू, मिस् डॉ. मेधा  खोले !

Dr. Medha Khole
Dr. Medha Khole

डॉ. खोले मॅडम, आपले आभार मानताना शब्द कमी पडतात. आपण पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात जी फिर्याद दाखल केलीत, त्यात आपला सोवळ्यातला स्वयंपाक बाटल्याची तक्रार करताना, आपले सुमारे १५ ते २o हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तो स्वयंपाक बाटण्याचे कारण आहे, तो स्वयंपाक एका यादवकुलीन मराठा निर्मला यादव या महिलेने केला होता. मराठ्यांच्या स्पर्शाने आपला ब्राह्मण धर्म बाटतो, हेच आपण आजमितीला दाखवून दिले. डॉ. खोले तुम्ही पुरोगामी महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घातलत. आपण मराठा समाजातील ८० वर्षीय महिलेला, तुमचा धर्म तिच्यापेक्षा वेगळा असल्याचे दाखवून दिले.

डॉ. खोले मॅडम, तुमचे आभार मानाने तितके कमी आहेत, असेच म्हणावे लागते. तुम्ही हे विश्वची माझे घर, अशी शिकवण देऊन जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर, तिर्थी धोंडा-पाणी, देव रोकडा सज्जनी असं सांगणाऱ्या संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या, समतेसाठी अखेरपर्यंत लढणारे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या, मनुस्मृतिने शिक्षण नाकारलेल्या स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवणारे महात्मा जोतिबा फुले-सावित्रीमाई फुले, समाजातल्या शूद्र अतिशूद्र वर्गाला २६ जून १९०२ रोजी आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज आणि स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेवर आधारित संविधान बहाल केलेले डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जन्मलात. या थोर महापुरुषांच्या प्रयत्नातून मिळालेल्या स्वातंत्र्यातून शिक्षण घेतलात, डॉ . झालात ! नाही तरी तुमचा धर्म तुम्हाला चुल आणि मूल या द्विसूत्रीत ठेवून होता.

डॉ. खोले मॅडम, या शिक्षणाच्या बळावर तुम्ही हवामान खात्याच्या संचालिका झालात. आपल्याला एका सुवासिनी ब्राह्मण स्वयंपाकी हवी होती, तुम्ही जोशी काकांना तुमची समस्या सांगितली. त्यांनी निर्मला कुलकर्णी सुहासिनी महिला निर्मला यादव ही महिला पाठवली. तिची जात तुम्हाला एका वर्षानंतर कळली, अन् तुमच्या घरात ब्राह्मण धर्म बाटला. डॉ. आपला स्वयंपाक बाटल्याने, तुमचे २० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले. मराठ्यांच्या स्पर्शाने तुम्ही बाटता हे पुराव्यानिशी सिध्द केले. थँक यू, मॅडम!

याच महाराष्ट्रात तुमच्या पूर्वजांनी राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणे, राजांना शूद्र ठरवून नाकारले होते. संत तुकोबांची गाथा रामेश्वर भट्टानी इंद्रायणीत बुडविली होती. क्रांतीज्योति सावित्री माईंना शेण आणि दगड मारले, महात्मा फुले यांना मारेकरी पाठवले, राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र नाकारले, त्या तुमच्या ब्राह्मणी पूर्वजांचा वारसा सिद्ध केलात. थँक यू, डॉ. खोले मॅडम ! 

मॅडम, सकल स्त्री जातीला सन्मान बहाल करणाऱ्या फुले दाम्पत्याचा तुम्हाला विसर पडला. या महाराष्ट्रात खरा शिवाजी सांगणाऱ्यांना गोळ्या खाव्या लागतात अन् चरित्र सोयीप्रमाणे मांडणी करून शिवचरित्र कलंकित करतात, त्यांना महाराष्ट्र भूषण देऊन गौरविले जाते. या महाराष्ट्र दुषणाच्या पुढे जाऊन पोहोचलात. त्या उंचीवरून तुम्ही सोवळ्याचा धर्म बाटल्याची आरोळी ठोकलीत, थँक यू, डॉ. खोले मॅडम !

निर्मला यादव या माऊलीने तिचा धर्म कुलकर्णी असल्याचे आपणास सांगितले नव्हते, असा तिचा दावा आहे. तिचा घरात गेल्यावर राजांची प्रतिमा पाहून, तिची जात तुम्हाला कळली अन् तुम्ही पोलिसात सोवळ्याचा स्वयंपाक बाटल्याची तक्रार दाखल केली. याचा दुसरा अर्थ निघतो की, तुम्हासारख्या श्रेष्ठ ब्राह्मण धर्माच्या अनुयायांचा आणि राजे श्री छत्रपती शिवरायांचा धर्म एक नाही. तुमच्या घरात राजांच्या प्रतिमेला स्थान नाही, थँक यू, डॉ. खोले मॅडम !

१९ व्या शतकात महात्मा फुले यांनी राजे श्री शिवरायांचा कुळवाडी भूषण पोवाडा लिहिला. १९ फेब्रुवारी १८६९ रोजी रायगडावर जाऊन पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली. ते फुले अन् टिळक-बलवंत मोरेश्वर पुरंदरे यांचा शिवाजी वेगळा असल्याचे डॉ. खोले मॅडम, आपण कृती तून दाखवून सिद्ध केले. 

महात्मा फुले यांच्या गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शूद्र पूर्वी कोण होते? या ग्रंथांनी शूद्रांचे स्थान यापूर्वीच स्पष्ट केले आहे. इतिहासाचे संशोधक कृष्णाजी अर्जून केळूस्कर यांचेही शिवचरित्र आम्हासाठी वाटाड्या आहे. अगदी अलीकडच्या काळात डॉ. आ. ह. साळुंखे, शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, शिवश्री श्रीमंत कोकाटे, आयु .वामन मेश्राम, शिवश्री प्रदीप सोळुंखे, स्वर्गीय (चुकलेच, कैलासवासी) कॉ. गोविंद पानसरे यांचे म्हणणे कालपर्यंत समाजाला अवास्तव वाटायचे, मात्र त्यांच्या म्हणण्याला आपण आपल्या कृतीतून पुष्टी दिलीय. 
सोवळे म्हणजे स्वच्छता आणि शुचिर्भूतपणा असे म्हटले जाते. आपल्या घरात निर्मला माऊलीने ते नियम पाळलेही असतील आणि ते पाळले गेले नसल्याने आपला सोवळ्याचा स्वयंपाक बाटला असेल तर त्यावर पोलिसी तक्रार फार तर तुमचे आर्थिक नुकसान भरून काढेल, परंतु जे धार्मिक नुकसान भरून काढायचे असेल तर त्यावर गोमूत्र हा एकमेव उपाय आहे. अन्य उपाय तुम्हाला मनुस्मृतिमध्ये सापडतील. ज्याला २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले होते. डॉ. खोले मॅडम, तुम्ही हवामान खात्याच्या संचालिका म्हणून काम केले. तुम्हाला समाजाच्या समाजमनाचा अंदाज आला नाही. हे या समाजाचे दुर्दैवच आहे ,असे म्हणावे लागते.

मॅडम, तुम्ही तुमचा सोवळ्याचा धर्म पाळण्यासाठी यज्ञ करा, निर्मला यादव या माऊलीच्या माझ्यासारख्या लेकरांना शाप द्या ! बस्स इतकेच !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com