वीज पडण्यापूर्वी कळणार अंदाज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

पुणे - पाऊस, थंडी, उन्हाळ्याचा अचूक अंदाज व्यक्त करण्याच्या यंत्रणेनंतर आता वीज पडण्याच्या तब्बल चोवीस तास आधी त्याची सूचना मिळू शकणार आहे. त्यामुळे वीज पडून माणसे आणि गुरांची जीविताची हानी टळू शकणार आहे. भारतीय हवाई दल आणि हवामान खाते या अभिनव मॉडेलसाठी एकत्रितरीत्या काम करीत आहेत.

मॉडेल उभारणीच्या पहिल्या टप्प्यात वीज पडल्याची माहिती संकलित करणाऱ्या केंद्रांचे जाळे देशभरात उभारण्यात येत आहे. ही माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांनी दिली. 

पुणे - पाऊस, थंडी, उन्हाळ्याचा अचूक अंदाज व्यक्त करण्याच्या यंत्रणेनंतर आता वीज पडण्याच्या तब्बल चोवीस तास आधी त्याची सूचना मिळू शकणार आहे. त्यामुळे वीज पडून माणसे आणि गुरांची जीविताची हानी टळू शकणार आहे. भारतीय हवाई दल आणि हवामान खाते या अभिनव मॉडेलसाठी एकत्रितरीत्या काम करीत आहेत.

मॉडेल उभारणीच्या पहिल्या टप्प्यात वीज पडल्याची माहिती संकलित करणाऱ्या केंद्रांचे जाळे देशभरात उभारण्यात येत आहे. ही माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांनी दिली. 

भारतीय उष्णकटिबंध हवामान संस्थेतर्फे (आयआयटीएम) आयोजित ‘लायटनिंग अँड एक्‍स्ट्रीम वेदर इव्हेंट’ या विषयावर आयोजित कार्यशाळेचे उद्‌घाटन डॉ. रमेश यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

‘‘वीज पडण्यापासून धावपट्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय हवाई दल सातत्याने बदलत्या हवामानाच्या नोंदी ठेवत असते. ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट याचाही अभ्यास हवाई दल करते. त्यासाठी देशभरातील १४२ ठिकाणी नोंद घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. हवाई दलाने हवामानाची संकलित केलेली ही माहिती प्रत्येक क्षणाला हवामान खात्याला मिळणार आहे. त्यामुळे हवाई दलाची माहिती आणि हवामान खात्याने उपग्रह, ड्रॉपलर रडार या माध्यमातून नोंदविलेल्या निरीक्षणांचे विश्‍लेषण करून वीज पडण्याचा अंदाज देणारे मॉडेल विकसित केले जात आहे.’’ 

वीज पडण्याचा अंदाज देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून अंदाज व्यक्त करता येईल. वीज पडण्याचा धोका असल्यास किमान चोवीस तास आधी त्याचा अंदाज देण्याची यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक अर्ध्या तासाने हवामानात होणाऱ्या बदलाचे निरीक्षण नोंदविण्यात येणार आहे. या माहितीच्या विश्‍लेषणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे याची त्रिमितीय माहिती उपलब्ध होणार आहे. त्या आधारावर दक्षिणपूर्व आशियातील वीज पडण्याचा अंदाज वर्तविणे शक्‍य होईल.
- डॉ. के. जे. रमेश, महासंचालक, भारतीय हवामान खाते

असे असेल मॉडेल 
हवामान खात्याकडे महाराष्ट्रात २० केंद्रे आहेत. तसेच उत्तर भारतातही काही केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. ही केंद्रे आणि हवामान खात्याकडे असलेली १४२ केंद्रे अशा एकूण १६२ केंद्रांमधून वीज पडण्याची माहिती संकलित करता येणार आहे. त्याचे विश्‍लेषण करून हे मॉडेल तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांनी सांगितले.  

जिल्हा प्रशासन उदासीन
वीज पडण्याची पूर्वसूचना देणारा संदेश लोकांपर्यंत पोचविण्यास राज्यातील जिल्हा प्रशासन उदासीन आहे. नांदेड आणि औरंगाबाद वगळता राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्याने वीज पडण्याचा संदेश लोकांपर्यंत पोचविणारी यंत्रणा उभारली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याचा किंवा बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुराच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी वीज पडण्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित केली आहे. त्याची माहिती राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला दिली आहे. जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातही वीज पडण्याची पूर्वसूचना देणारी संगणकीय प्रणाली सक्रिय करून दिली आहे. 

मात्र, त्याचा प्रभावी वापर होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात फक्त नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यात या आधारावर नागरिकांच्या मोबाईल फोनवर वीज पडण्याची पूर्वसूचना देणारा संदेश पाठविला जातो, असेही सूत्रांनी सांगितले. ही यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत तांत्रिक माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे. मात्र, त्याचा उपयोग लोकांसाठी होत नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली.

Web Title: Know Electricity logging forecast