एकत्र आले ठाकरे, फडणवीस, गडकरी आणि नारायण राणे

शिवप्रसाद देसाई
शनिवार, 24 जून 2017

राणे भाषणासाठी उभे राहिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पुन्हा घोषणा दिल्या. राणे काय बोलणार याची उत्सुकता होती. राणेंनी फडणवीस, गडकरी यांच्यासह उद्धव ठाकरेंचे आदरपूर्वक नाव घेतले.

कुडाळ - नवे-जुने राजकीय वैरी एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याचा आणि विकासात राजकारण दूर ठेवण्याच्या आणाभाका घेण्याचा दुर्मिळ अनुभव आज सिंधुदुर्गवासीयांनी घेतला. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, केंद्रीय दळण-वळणमंत्री नितीन गडकरी असे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येण्याची किमया घडली. यावेळी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेंनी "कोई माने या ना माने...एकत्र आले उद्धवजी, देवेंद्रजी, नितीनजी आणि नारायण राणे' अशा शब्दांत हा क्षण कविताबद्ध करून टाळ्याही मिळविल्या. 

राजकारणातील दिग्गज एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाविषयी प्रचंड उत्सुकता होती. गडकरी, ठाकरे, राणे, आठवले, सुरेश प्रभू, अनंत गिते, चंद्रकांत पाटील, रामदास कदम अशी मंडळी यानिमित्त एकत्र आली. यावेळी शिवसेना, भाजपबरोबरच राणे समर्थकांनीही गर्दी केली होती. राणे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. 

राणे भाषणासाठी उभे राहिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पुन्हा घोषणा दिल्या. राणे काय बोलणार याची उत्सुकता होती. राणेंनी फडणवीस, गडकरी यांच्यासह उद्धव ठाकरेंचे आदरपूर्वक नाव घेतले. चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाचा हा आनंददायी क्षण आहे, असे सांगून विकास आहे तिथे पक्षीय राजकारण नको, असा सल्ला राणे यांनी दिला. महाराष्ट्राला महाराष्ट्रच राहू द्या, असे मुख्यमंत्र्यांना सांगायलाही राणे विसरले नाहीत. 

गडकरींचे भाषण म्हणजे कोकण विकासासाठी येऊ घातलेल्या पायाभूत विकासाच्या प्रकल्पांची लांबलचक यादीच ठरली. उद्धव ठाकरे, फडणवीस यांचा आदरपूर्वक उल्लेख करण्याबरोबरच गडकरींनी राणेंचा "माझे मित्र' असा उल्लेख केला. 

उद्धव ठाकरे राणेंविषयी काय बोलतात याची उत्सुकता होती. त्यांनी भाषणाच्या सुरवातीलाच "माझे जुने सहकारी नारायण राणे' असा उल्लेख केला. आपल्या छोटेखानी भाषणात बाळासाहेबांना कोकणविषयी आणि कोकणवासीयांना त्यांच्याविषयी असलेल्या प्रेमाची आठवण करून दिली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातही पर्यटन, रोजगार यावर भर होता. 

काँग्रेसचे चौघे पदाधिकारी ताब्यात 
कार्यकर्ते आणि नेत्यांना प्रवेशावरून कार्यक्रमावेळी गोंधळही झाला. "व्हीआयपी' कक्षातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांना प्रवेश न दिल्याने जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह पदाधिकारी संतप्त झाले. त्यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सावंत, सामंत यांच्यासह काँग्रेसच्या चार पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.