तळकोकणला पावसाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

राज्यातील पाऊस
मुंबईत मुसळधार; पुण्याला पावसाने झोडपले
गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची शक्यता
राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले 
पंचगंगा आणि भोगावती नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा
कोयनानगरसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात मुसळधार
रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी; दोन पूल पाण्याखाली
हर्णे, दापोली आंजर्ले बंदरात पाच मासेमारी नौका उलटल्य

पुणे - कोकणसह मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मंगळवारी तळकोकणाला मुसळधार पावसाने झोडपले; तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांत पावसाचा जोर होता. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागांसह धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ झाली. विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस झाला.

दरम्यान,  उद्या (ता. २०) मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. 

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांतील काही मंडळांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रविवारी दिवसभर पडला. मध्य महाराष्ट्रातील साताऱ्यातील महाबळेश्वर, वाई, पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, शिरूर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड अशा काही तालुक्‍यांतील मंडळांत हलका ते मध्यम पाऊस पडला. नाशिकमधील इगतपुरी भागातही हलका पाऊस पडला. उर्वरित भागांत ढगाळ हवामान होते. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबारमधील काही मंडळांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. नगर, सोलापूर, सातारा, सांगलीतील काही भागांत पावसाचा जोर कमी आहे. 

मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरीही बरसल्या. विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते.   

कोकणातील रायगड जिल्ह्यात महाड, म्हसाळा, खामगाव मंडळांत अतिवृष्टी झाली. रत्नागिरीतील चिपळूण, दापोली, दाभोळ, गुहागर, पावस, मालगुंड, राजापूर आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्गमधील देवगड, बांदा, आजगाव, अंबोली, वेंगुर्ला, शिरोडा, कणकवली, वैभववाडी, येडगाव, भुईबावडा, तळवात, भेंडाशी मंडळांत अतिवृष्टी झाली. 

मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. खानदेशातील धुळे जिल्ह्यातील साक्री, नंदुरबारमधील खांदबरा, सोमावळ, जळगावमधील लासूर, साताऱ्यातील हेळवक, महाबळेश्वर, तापोळा, लामज, कोल्हापुरातील  गगनबावडा, सालवन, औंरंगाबादमधील सिल्लोड मंडळात अतिवृष्टी झाली. 

आजही मुसळधारेचा अंदाज
उद्या (ता. २०) मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. येत्या गुरुवार(ता. २१)पर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तर भाग आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शनिवारपर्यंत (ता. २३) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

१०४ मंडळांत अतिवृष्टी 
कोकण ते केरळ या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि औरंगाबाद जिल्हा अशा एकूण १०४ मंडळांत अतिवृष्टी झाली. हर्णे येथे सर्वाधिक ३७० मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडला .

हर्णैमध्ये पाच नौकांना जलसमाधी
जोरदार पाऊस आणि वादळाने हर्णै बंदरामध्ये थैमान घातले. वादळात ५ मासेमारी नौकांना जलसमाधी मिळाली. वादळामुळे मच्छीमारांचे सुमारे दीड ते दोन कोटींचे नुकसान झाले. या ५ नौकांवर एकूण २९ खलाशी होते. त्यापैकी २६ खलाशांना वाचविण्यात यश आले; परंतु ३ खलाशी अजूनही बेपत्ताच आहेत. ’गगनगिरी’, ’सद्‌गुरू प्रसाद’, ’भक्ती’, ’आयेशा’, ‘साईगणेश’ अशी बुडालेल्या नौकांची नावे आहेत. 

पुन्हा चुकवला ठोका
मुंबई - मुसळधार पावसाने विजांच्या कडकडाटात मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसराला झोडपून काढत २९ ऑगस्टच्या अतिवृष्टीची आठवण करून दिली. या पावसामुळे मुंबईच्या काळजाचा ठोका काही वेळा चुकला. हार्बर, पश्‍चिम आणि मध्य रेल्वेही कोलमडली आणि नेहमीप्रमाणे सगळ्या यंत्रणांनी या पावसापुढे गुडघे टेकले. दिवसभर मुंबईत १३६.५ मिलिमीटर पाऊस झाला. १० वर्षांतील सप्टेंबर महिन्यातील हा चौथा सर्वाधिक पाऊस आहे.

Web Title: maharashtra news heavy rain konkna mumbai maharashtra