"समृद्धी'साठी कोरियाची मदत मिळवण्याचे प्रयत्न 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी स्थानिक बॅंकांकडून कर्ज मिळत नसल्याने अखेर कोरियातील बॅंकांना साकडे घातले जाणार आहे. तसेच राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्प आणि नागपूर व पुणे विमानतळासाठी आर्थिक साह्य मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळ 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान दक्षिण कोरिया व सिंगापूर दौऱ्यावर जाणार आहे. 

या दौऱ्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याबरोबरच काही महत्त्वाचे सामंजस्य करार केले जाणार आहेत. 48 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गासाठी स्थानिक बॅंकांनी 7 ते 8 हजार कोटींपेक्षा अधिक आर्थिक साह्य देण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे कोरियातील बॅंकांकडून आर्थिक मदत मिळवण्याचा पर्यायी विचार सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली. 

कोरियातील "कोरिया लॅंड अँड हाऊसिंग कॉर्पोरेशन'ने वांद्रे येथील सरकारी वसाहतीच्या पुनर्विकासात रस दाखवला आहे. या दौऱ्यात कॉर्पोरेशनसोबत सामंजस्य करार अपेक्षित आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाबाबत कोरिया सरकारला शिफारस केली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाला कोरियातील संस्थांकडून निधी मिळावा यासाठी दौऱ्यात खास प्रयत्न केले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. खरेतर देवेंद्र फडणवीस गेल्या ऑगस्टमध्ये दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जाणार होते, मात्र तो अचानक रद्द करावा लागला होता. समृद्धी महामार्ग 2020 पर्यंत पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.