शरद पवार, गणपतराव देशमुख यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबई - माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर येत्या 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधिमंडळात पांडण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच विधानसभा मतदारसंघातून तब्बल 11 वेळा निवडून आलेल्या शेकापच्या गणपतराव देशमुख यांच्या देखील अभिनंदनाचा प्रस्ताव याच दिवशी चर्चेला येणार आहे. 9 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, तर 10 ऑगस्ट रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय आणि नानाजी देशमुख यांच्या अभिनंदनाचे प्रस्ताव चर्चेला येणार आहेत.

शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली असून, त्यांनी राज्यात मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच केंद्रात विविध मंत्रिपदे भूषविली आहेत. राज्याच्या विधिमंडळाची दोन्ही सभाग्रहे आणि केंद्रात लोकसभा आणि राज्यसभेत प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. त्यांच्या राजकारणाची देशपातळीवर नेहमीच दखल घेतली जात आहे. भारतीय राजकारण आणि समाजकार्यातील त्यांच्या कामगिरीची केंद्र सरकारने दखल घेत त्यांना पद्‌मविभूषण पुरस्काराने गौरविले आहे.

विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून अकराव्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळविला आहे.
2009 च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते.