मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाने देशभरातले सामाजिक वातावरण ढवळून निघालेले असताना आता राजधानी मुंबईतल्या महामोर्चावर आज शिक्‍कामोर्तब झाले. मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्याचा एकमताने निर्णय झाला. हॉटेल सम्राटमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुंबईतल्या महामोर्चाची घोषणा करण्यात आली. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार असून, आतापर्यंतच्या मोर्चामध्ये असलेल्या आचारसंहितेनुसार हा मोर्चा होईल, असे समितीने स्पष्ट केले.

आजपर्यंत मराठा समाजाने राज्यभरात 58 मोर्चे काढले आहेत; मात्र केंद्र व राज्य सरकार अद्यापही मराठा समाजाला न्याय देण्यासाठी गंभीर नसल्याची खंत या बैठकीत व्यक्‍त करण्यात आली. मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्याचे याअगोदर दोन वेळा ठरले होते; मात्र काही कारणास्तव हा मोर्चा झाला नव्हता. त्यामुळे मराठा समाज शांत व स्तब्ध झाल्याची टीका होत होती; पण राज्य व केंद्र सरकारने मराठा समाजाच्या न्याय मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिल्याने मुंबईतला मोर्चा लांबणीवर पडला होता. मोर्चाच्या आयोजनानिमित्त 6 जून या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे निमित्त साधून रायगडावर शपथ घेतली जाणार आहे. मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मोर्चाचे वादळ घोंघावतच राहील, अशी शपथ घेतली जाईल, अशी माहिती समन्वय समितीने दिली.

कोपर्डी येथील ज्या अमानवी क्रूर घटनेनंतर मराठा मोर्चे सुरू झाले, त्या घटनेतील बळी गेलेल्या भगिनीला 13 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त राज्यभरातील समन्वयक कोपर्डीत जमा होऊन श्रद्धांजली वाहणार आहेत.