पवार यांच्या दूरदृष्टीमुळे शेतीच्या क्षेत्रात क्रांती - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मुंबई - शरद पवार यांचा व्यापक जनसंपर्क आणि महाराष्ट्रातील जनतेशी असलेली बांधिलकी असामान्य आहे. त्यामुळे सलग चौदा वेळा जनतेने त्यांना निवडून दिले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शेतीच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे, असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत काढले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्याही अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला.

केंद्रात कृषिमंत्री असताना त्यांनी आखलेल्या धोरणानुसार आम्ही राज्यातील उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनावर आणण्याचा निर्णय घेतला, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की महाराष्ट्राचे समाजकारण आणि राजकारण हे त्यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. सामाजिक न्यायासाठी त्यांनी अनेक प्रश्न सोडविले, महिला सक्षमीकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण, राज्यात पाहिले महिला धोरण हे त्यांनी राज्यात आणले.

पवारांचे कर्तृत्व तरुणांना दिशादर्शक - राणे 
"पवारांचे कर्तृत्व तरुणांना दिशादर्शक आहे, राजकारण, समाजकारण यासह अन्य क्षेत्रातील प्रचंड अभ्यास असलेला शरद पवार यांच्यासारखा नेता आज तरी देशात नाही,' अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पवारांचे कौतुक विधान परिषदेत केले. "लोकमान्य टिळक, यशवंतराव चव्हाण, डांगे यांच्या पंक्तीत स्वकर्तृत्वाने गेलेला नेता म्हणजे शरद पवार,' असे राणे म्हणाले. 

शरद पवार यांच्याकडून संस्कार शिकावेत, माणुसकी कशी जोपासावी, मैत्री कशी करावी आणि टिकवावी, हे पवार यांच्याकडून शिकावे, असे सांगताना राणे यांनी काही कौटुंबिक आठवणी सांगितल्या. शरद पवार कोणत्या रसायनाने बनले आहेत, तेच कळत नाही. आमदार झाल्यावर वयाच्या 27 व्या वर्षी काम करण्याची असलेली ताकद होती तीच आज कायम असल्याचे राणे म्हणाले. पवार यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या कारकिर्दीचा गौरव केला. महाराष्ट्राच्या नेत्याचा असा गौरव होत असताना माझा ऊर भरून आला, आपल्या राज्यातील नेत्याची अशी मोठी कारकीर्द बघून आमच्यासारख्या नेत्यांना आनंद होतो, ते कोणत्या पक्षाचे नेते आहेत हा मुद्दा गौण असल्याचे सांगताना राज्यातील प्रत्येकाला पवार यांच्या कर्तत्वाचा अभिमान असायला हवा, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली. देशात आणि राज्यातील झालेल्या कृषी क्षेत्राच्या विकासात पवार यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.