मंत्री झालो याची शेट्टींना असुया..! - सदाभाऊ खोत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 जून 2017

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर आज सदाभाऊ खोत यांनी पहिल्यांदाच थेट हल्लाबोल करत " मी मंत्री झालो याचीच शेट्टी यांना असुया आहे,' अशा शब्दांत वादाची ठिणगी टाकली. मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना खोत यांनी आतापर्यंत पाळलेले मौन सोडत थेट त्यांचे नेते शेट्टी यांच्यावर टीका केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतली दुफळी चव्हाट्यावर आली आहे.

शेट्टी यांना माझ्या मंत्रिपदाची असुया असल्याने, मी मंत्री झाल्यानंतर शेतकरी संघटनेचे अध्यक्षपद हातातून जाते की काय या भीतीने त्यांनी माझ्याविरोधात रान उठवले असल्याचा थेट आरोपदेखील सदाभाऊ खोत यांनी या वेळी केला. आत्मक्‍लेश यात्रेनंतर राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यात दुफळी पडली आहे. राजू शेट्टी यांच्याकडे आता कोणताही कार्यक्रम उरलेला नाही, म्हणूनच ते रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. मी एकटाच शेतकऱ्याचा तारणहार असल्याचे ते दाखवत असून, मी पण शेतकऱ्याच्या घरात जन्म घेतला आहे. मी काय टाटा-बिर्ला यांच्या घरातून आलेलो नाही, अशा शब्दांत खोत यांनी शेट्टी यांच्यावर तोफ डागली. एका समान्य शेतकऱ्याच्या घरातला मी मंत्री झाल्यानंतर शेट्टी यांच्या मनात अनेक महिन्यांपासून असुया होती. त्या असुयेला आता त्यांनी वाट मोकळी करून दिल्याचा टोलाही खोत यांनी लगावला.
शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शेट्टी हिरो बनण्याचा प्रयत्न करत आहेत; पण सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने काम करत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकारने सर्वाधिक प्राधान्य दिले, असे खोत या वेळी म्हणाले.

.. प्रत्येकाला नेता व्हायचंय ..
शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी काही शेतकरी प्रतिनिधींना घेऊन गेलो होतो; मात्र आता शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन करणाऱ्या प्रत्येकालाच नेता होण्याची स्वप्न पडत असल्याची टीका सदाभाऊ यांनी केली. शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.