'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

राजेश मापुसकरांनी पटकावला दिग्दर्शनाचा पुरस्कार

राजेश मापुसकरांनी पटकावला दिग्दर्शनाचा पुरस्कार
मुंबई - "सकाळ प्रीमियर ऍवॉर्डस्‌ 2017'च्या नुकत्याच झालेल्या पहिल्यावहिल्या दिमाखदार सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारका प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात अवतरले होते. नवख्या कलाकारांपासून मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिलेले ज्येष्ठ-श्रेष्ठ मान्यवरही "सकाळ' आणि "प्रीमियर'वरील प्रेमापोटी आवर्जून उपस्थित होते. अवघी सिनेसृष्टी सोहळ्याला लोटली होती. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्यात "हाफ तिकीट'ने विविध विभागांतील तब्बल सहा पुरस्कार पटकावत सोहळ्यावर छाप पाडली. "व्हेंटिलेटर' व "वायझेड'ने प्रत्येकी चार पुरस्कार पटकावले. प्रीमियर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार "व्हेंटिलेटर' व "हाफ तिकीट' यांना विभागून देण्यात आला.

"व्हेंटिलेटर'साठी राजेश मापुसकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. "जाऊं द्या ना बाळासाहेब'साठी गिरीश कुलकर्णीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. प्रियांका बोस व सई ताम्हणकर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या. त्यांना अनुक्रमे "हाफ तिकीट' व "वजनदार' चित्रपटांसाठी गौरवण्यात आले. "सकाळ प्रीमियर ऍवॉर्डस्‌'चे आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सर्व विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

पुष्कर श्रोत्री व सिद्धार्थ चांदेकर यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, मानसी नाईक, सोनाली कुलकणी, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे-आदिनाथ कोठारे, रॅपर श्रेयस जाधव व तरुणींच्या हृदयाची धडकन बनलेला अभिनय बेर्डे यांच्या दिलखेचक नृत्यांनी सोहळ्याला चार चॉंद लावले. "चला हवा येऊ द्या' टीमच्या स्कीटने सोहळ्यात धमाल उडवली.

मुख्य प्रायोजक "पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स'चे सौरभ गाडगीळ, "गणराज असोसिएटस्‌'च्या संचालिका वैष्णवी जाधव, "लॅण्डस्केप'चे व्यवस्थापकीय संचालक ऍड. पंडित राठोड, "इन्फ्राटेक'च्या संचालिका अलंक्रित राठोड, "ब्राईट आउटडोअर'चे योगेश लखानी, सिबा पीआरचे सचिन अडसूळ, "बंदूक्‍या'चे निर्माते राजेंद्र बोरसे, दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी, कलाकार नामदेव मुरकुटे, नीलेश बोरसे, शशांक शेंडे, "झी युवा' व "झी टॉकीज'चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर आदी मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या कलाकारांचा गौरव करण्यात आला. अभिनेत्री प्रीती झिंटाही या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होती.

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स हे सोहळ्याचे मुख्य प्रायोजक; तर "गणराज असोसिएटस्‌' असोसिएट पार्टनर आहेत. "लॅण्डस्केप' व "बंदूक्‍या' हे पार्टनर; तर "ब्राईट आउटडोअर' हे आउटडोअर पार्टनर आहेत.

सोशल इम्पॅक्‍ट ऍवॉर्डने गौरव
समाजमनावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या चित्रपटांचाही या वेळी "सकाळ'तर्फे विशेष गौरव करण्यात आला. सोहळ्याचे ते वैशिष्ट्य ठरले. अभिनेत्री जुही चावला, रविना टंडन, अभिनेता विवेक ओबेरॉय व सयाजी शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना मानाचा "सकाळ प्रीमियर सोशल इम्पॅक्‍ट ऍवॉर्ड' देऊन गौरवण्यात आले. "दशक्रिया' सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट ठरला. विनोदी चित्रपट म्हणून "चिठ्ठी'ला गौरवण्यात आले. "युवा प्रीमियर फेस ऑफ द इयर'ने अभिनेता अभिनय बेर्डेचा सन्मान करण्यात आला.

"झी टॉकीज'वर पुनर्प्रक्षेपण
चित्रपटसृष्टीतील प्रयोगशीलतेला मानाचा मुजरा करणारा "सकाळ प्रीमियर ऍवॉर्डस्‌' सोहळा प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. रविवारी (ता. 3) "झी युवा वाहिनी'वर सोहळ्याचे प्रक्षेपण करण्यात आले. "झी टॉकीज'वरही 17 सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजता त्याचे पुनर्प्रक्षेपण होणार आहे.