सणच बंद करण्याचे आदेश काढा - ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

मुंबई - पंचाग फाडून टाका, सण थोतांड असल्याचे जाहीर करून ते बंद करण्याचे आदेशच काढा, अशा शब्दांत संताप व्यक्त करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फटाके बंदीला विरोध केला आहे. शांततेचा अतिरेक झाल्यावर एक दिवस असंतोषाचा स्फोट होईल. सणांच्या आड येणार असाल तर शिवसेना सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

निवासी क्षेत्रात फटाके विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. त्याच वेळी महाराष्ट्रात प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे प्रयत्न करण्याचे आश्‍वासन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिल्यावर आज पक्षप्रमुख उद्धव यांनीच फटाके बंदीला तीव्र विरोध केला. कोणतेही सण साजरे न करण्याचे आदेश काढा, म्हणजे सण आणि फटाक्‍यांचा प्रश्‍नच राहणार नाही, अशा शब्दांत उद्धव यांनी संताप व्यक्त केला. प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे सण साजरा करत असतो. त्यांच्या आड आलात तर शिवसेना सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

कदमांची कोंडी 
प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन रामदास कदम यांनी दिल्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी (ता. 10) तीव्र विरोध केला. बुधवारी उद्धव यांनी फटाके बंदीला विरोध केल्याने राजकीय दृष्ट्या अडचणीत असलेल्या कदम यांची कोंडी होण्याची शक्‍यता आहे.