पूर्वी माफी देऊनही शेतकरी कर्जबाजारी कसा? - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - 'खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे म्हणून निकष लावण्यात आले आहेत. मात्र विरोधक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवीत आहेत. यापूर्वी तुम्ही कर्जमाफी केली होती, तरी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी का झाला? यापूर्वीच्या कर्जमाफीत बॅंका आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हात धुऊन घेतले. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल 2004मध्ये आला होता. त्यावर 2014 पर्यंत कार्यवाही का केली नाही,''

अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे रंगमंदिरात पार पडली. समारोपाचे भाषण करताना मुख्यमंत्री म्हणाले, 'योग्य शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी कर्जमाफीची ऑनलाइन पद्धत स्वीकारली आहे. पीकविमा भरताना सुमारे 40 लाख शेतकरी ऑनलइन फॉर्मसाठी पुढे आले. मग विरोधकांना त्यात काय अडचण आहे?''

'कर्जमाफी द्या म्हणून ओरडणारे आता कर्जमाफी दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवीत आहेत. त्यांच्यावर जनतेचा अजिबात विश्वास नसून हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सिद्ध झाले आहे,'' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ही तर जिवाणू समिती
मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सुकाणू समितीवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले, ""आम्ही 34 हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी केली. तरीही काही जण मृतावस्थेत असलेल्या संघटनांना जागे करत आहेत. ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले असे लोक या समितीत आहेत. सरसकट सव्वा लाख कोटी कर्जमाफी मागणाऱ्यांची तोंडे गेल्या दहा वर्षांत का गप्प होती. सव्वा लाख कोटींची कर्जमाफी करून कोणतेही राज्य टिकू शकणार नाही. चीनमध्ये पाऊस पडला की येथे छत्र्या उघडणारे लोक सुकाणू समितीच्या पाठीशी आहेत. राज्यातील जनता यांच्या छत्र्यांना भीक घालणार नाही. ही सुकाणू समिती आहे की जिवाणू समिती?''

सरकार पाडण्याची हिंमत नाही
'मी दिल्लीत जाणार आहे, अशा कितीही वावड्या उठवल्या तरी मीच राज्यात मुख्यमंत्रिपदी राहणार आहे. जोपर्यंत मला दिल्लीत बोलावले जात नाही, तोपर्यंत या पदावरून मला कोणीही हटवू शकत नाही,'' असेही फडणवीस यांनी ठणकावून सांगताना शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे संकेत दिले. तसेच आपल्या सरकारला पाडण्याची हिंमत कोणात नाही, असा ठाम विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हेही पदावर कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

2019 च्या तयारीला लागा
'राज्यात भाजपचे 90 हजार बूथ आहेत. या प्रत्येक बूथची जबाबदारी एका पदाधिकाऱ्यावर सोपवली जाईल. मीदेखील एका बूथची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे कामाला लागा. शेवटच्या घटकापर्यंत पोचा. केंद्राच्या तसेच राज्याच्या योजना जनतेपर्यंत पोचवा,'' असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2019 च्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सूचित केले.

महाराष्ट्र

पुणे - कोकणसह मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाच्या...

06.27 AM

नाशिक  - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला...

05.48 AM

मुंबई - भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्यानंतर आज शिवसेनेचे चार मंत्री मंत्रालयात उपस्थित होते, तर आमदारही मंत्रालयात...

05.03 AM