दहावीच्या पुस्तकांत कमळ फुलवले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

शालेय वयातच दहावीच्या विद्यार्थ्यांना भाजपची स्तुती करणारी माहिती देऊन त्यांच्या मनावर भाजपची महती बिंबवली जात आहे. माहिती द्यायची होतीच, तर भाजप व संघाचे संबंध याबद्दल आणि संघाची स्वातंत्र्यपूर्व काळातील धोरणे याबद्दलही माहिती द्यायला हवी होती. 
- सचिन सावंत, कॉंग्रेस प्रवक्ते 

मुंबई - दहावीच्या राज्यशास्त्राच्या नव्या पुस्तकात अभ्यास मंडळाने कमळ फुलवल्याचा आरोप केला जात आहे. आर्थिक सुबत्तेसाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न पक्षाने यात केला आहे. तर, घराणेशाहीमुळे कौटुंबिक मक्तेदारी निर्माण झाल्याचे नमूद करत कॉंग्रेसला चिमटा काढला आहे. 

दहावीचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. इतिहास व राज्यशास्त्र या विषयांच्या पुस्तकांत राष्ट्रीय आणि प्रादेशिक माहिती देताना भाजप कशाप्रकारे आर्थिक सुधारणांवर भर देतो, हे पटवण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटक व अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाजकल्याण हे कॉंग्रेसचे धोरण असल्याचे यात नमूद केले आहे. घराणेशाहीवरून कॉंग्रेसला चिमटा काढताना कुटुंबाचा प्रभाव राहण्यासाठी नातेवाइकांना निवडणुकीत उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो, असे म्हटले आहे. 

बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार शिवसेनेने अमराठी विरोध सौम्य केला आहे, असे पुस्तकात नमूद केले आहे. 

परदेशी नेतृत्वावरून डाव्यांवर टीका 
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची माहिती देताना चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारावे यावरून हा पक्ष फुटल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

शालेय वयातच दहावीच्या विद्यार्थ्यांना भाजपची स्तुती करणारी माहिती देऊन त्यांच्या मनावर भाजपची महती बिंबवली जात आहे. माहिती द्यायची होतीच, तर भाजप व संघाचे संबंध याबद्दल आणि संघाची स्वातंत्र्यपूर्व काळातील धोरणे याबद्दलही माहिती द्यायला हवी होती. 
- सचिन सावंत, कॉंग्रेस प्रवक्ते 

प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका पुस्तकात मांडण्यात आली आहे. प्रत्येक राज्यातील राजकीय पक्षांची माहिती द्यायला मर्यादा आहेत म्हणून जो प्रादेशिक पक्ष मोठा, त्याबाबत माहिती देण्यात आली आहे. 
- डॉ. श्रीकांत परांजपे, अध्यक्ष, इतिहास व राज्यशास्त्र पुस्तक समिती

Web Title: new book of 10th bjp