उजनीचे पाणी पंढरपुरात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

दगडी पूल पाण्याखाली; किनाऱ्यावरच्या नागरिकांचे स्थलांतर

दगडी पूल पाण्याखाली; किनाऱ्यावरच्या नागरिकांचे स्थलांतर
पंढरपूर - उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी गुरुवारी सकाळी पंढरपुरात पोचले. दुपारी 12 वाजता जुना दगडीपूल पाण्याखाली गेला. या वर्षी प्रथमच चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागल्याने शहरातील नागरिकांनी नौका विहाराचा आनंद लुटला. अंबाबाई मंदिरालगत असलेल्या नदीपात्रातील झोपडपट्टीतील नागरिकांचे रामबागेत स्थलांतर करण्यात आले.

नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले आहे. त्याचबरोबर इतर मंदिरे व शिखरेदेखील पाण्यात गेली आहेत. जुना दगडीपूल पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बंधाऱ्यामुळे पाणी फुगवटा होऊ नये म्हणून कालच येथील दोन्ही बंधाऱ्याची दारे काढली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच चंद्रभागानदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीपात्रात पाणी येताच येथील अनेक नागरिकांनी नौका विहाराचा आनंद लुटला. येथील अंबाबाई मंदिराच्या बाजूला नदीपात्रात रहिवासी अतिक्रमणे वाढली आहेत. येथील नागरिकांना पालिका व महसूल प्रशासनाने अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बरोबरच तालुक्‍यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनादेखील सतर्कतेच्या सूचना दिल्याचे तहसीलदार मधूसुदन बर्गे यांनी सांगितले.

उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातही मुसळधार झालेल्या पावसाचे पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन धरण शंभर टक्के भरले आहे. आज दुपारपर्यंत दौंड येथून सुमारे 70 हजार क्‍युसेकचा विसर्ग धरणात येत होता. त्यामुळे उजनी धरण व्यवस्थापन विभागाने आज पुन्हा विसर्ग वाढवला. बुधवारी रात्री धरणातून 40 हजार क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडले होते. त्यानंतर आज त्यात 25 हजारांची वाढ करण्यात आली. दुपारी एकूण सुमारे 65 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रातील सर्व बंधारे भरून वाहू लागले आहेत.

उजनी धरणातून नदीपात्रात एकूण 65 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले आहे. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत 45 हजार क्‍युसेक पाणी पंढरपुरातील चंद्रभागा नदीपात्रात पोचले होते. शुक्रवारपर्यंत (ता.1) 15 हजाराने वाढ होऊन पंढरपुरात 60 हजार क्‍युसेकचा विसर्ग राहील. त्यामुळे उद्या आणखी तीन ते चार फुटांनी पाणी वाढेल; परंतु पूर परिस्थिती येईल असे सध्या तरी वाटत नाही.
- सर्जेराव शिंदे, कार्यकारी अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर