भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

सोलापूर - सध्या भाजपकडून वेगवेगळ्या पक्षांतील लोकांना आपलेसे केले जात आहे, त्यामुळे त्या पक्षाची नीतिमत्ता बदलली आहे. भाजप म्हणजे खरेदी- विक्री संघ झाल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केली. राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय कॉंग्रेसचा लढा थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर - सध्या भाजपकडून वेगवेगळ्या पक्षांतील लोकांना आपलेसे केले जात आहे, त्यामुळे त्या पक्षाची नीतिमत्ता बदलली आहे. भाजप म्हणजे खरेदी- विक्री संघ झाल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केली. राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय कॉंग्रेसचा लढा थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

खासदार चव्हाण म्हणाले, 'अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहेत. कर्जमाफीच्या अर्जात सरकार शेतकऱ्यांची जात विचारते आहे. आता जात विचारून कर्जमाफी देणार आहे का? हे सरकारच जातीयवादी आहे. एकट्या मराठवाड्यात सात दिवसांमध्ये तब्बल 34 शेतकऱ्यांनी, तर एक जानेवारी ते 13 ऑगस्ट या सात महिन्यांत 580 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.''

'दहा हजार उचल योजनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. राज्यात एक कोटी 36 लाख खातेदार शेतकरी असताना 14 ऑगस्टपर्यंत 24 हजार 131 शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला आहे. त्यात 24 कोटी रुपयांचेच वाटप झाले आहे. यावरून या योजनेचा पूर्ण बोजवारा उडाल्याचे दिसून येते. चालू खरीप हंगामासाठी 40 हजार कोटी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, हंगाम संपत आला असतानाही आतापर्यंत केवळ 14 हजार कोटी म्हणजेच उद्दिष्टाच्या 35 टक्के पीक कर्जवाटप झाले आहे,'' असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना पदाचे भान नाही
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषा अलीकडच्या काळात बदलली आहे. आपल्या पदाचे भान त्यांना राहिले नाही. अशा प्रकारची भाषा त्यांना शोभणारी नाही. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार, शेतकरी, व्यापारी सर्वांचेच प्रचंड नुकसान झाले. परंतु, राज्य सरकारला आता केवळ टोलचालकांचा पुळका आला असून, सरकारने टोलचालकांना 142 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे,'' अशी टीका चव्हाण यांनी केली.

भाजप सरकारच्या तीन वर्षांच्या सत्ताकाळात "मॉब लिंचिंग'मुळे 50 लोकांचा जीव गेला आहे. या घटनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत. सरकार त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही. हरियानामध्ये जे काही घडले आहे, त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस