'एक मराठा' देणार 'लाख मराठा' तरुणांना सैन्य दलाचे प्रशिक्षण 

राजेभाऊ मोगल
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

मराठा क्रांती मोर्चाची सुरवात औरंगाबादेने करून दिल्याने येथूनच सामाजिक बांधिलकी जपण्याचे उपक्रम सुरू व्हावेत. केवळ घोषणेपुरतेच मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृती हवी, या हेतूने प्रा. भोसले यांनी हे अभियान हाती घेतले आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही मिळेल ते काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ही कामे करण्यापेक्षा आपल्याला हवे ते करता यायलाच हवे, यासाठी या मुलांना दिशा दाखविण्याची गरज आहे.

औरंगाबाद, : राज्यात कधी नव्हे अशा संख्येने मराठा समाज एकत्र आला आणि ऐतिहासिक महामोर्चातून ताकद दाखविली. या काळात "एक मराठा लाख मराठा' अशी घोषणा देत एकीची वज्रमूठ अधिक मजबूत करण्यात आली. या धर्तीवर "एक मराठा' हा "लाख मराठा' तरुणांना सैन्य दलातील मोठ्या भरतीसाठी मोफत प्रशिक्षण देणार असल्याची शिवप्रतिज्ञा येथील प्रा. राजेश भोसले यांनी घेतली आहे. यासाठी ते गावागावांतील मराठा मुलांशी समन्वय साधण्यासाठी थेट ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करणार आहेत. 

मराठा क्रांती मोर्चाची सुरवात औरंगाबादेने करून दिल्याने येथूनच सामाजिक बांधिलकी जपण्याचे उपक्रम सुरू व्हावेत. केवळ घोषणेपुरतेच मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृती हवी, या हेतूने प्रा. भोसले यांनी हे अभियान हाती घेतले आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही मिळेल ते काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ही कामे करण्यापेक्षा आपल्याला हवे ते करता यायलाच हवे, यासाठी या मुलांना दिशा दाखविण्याची गरज आहे. रस्ता दाखविल्यास तो कसाही असो, त्यावरून चालण्याची ताकद या मुलांमध्ये असतेच. त्यासाठी त्यांना मार्गदर्शनाची, प्रत्यक्ष धडे देण्याची गरज ओळखून प्रशिक्षणाची घोषणा केली. 

सध्या अर्धसैनिक दलात 57 हजार जागांवर भरती होणार असल्याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. असे सांगितले जाते, की मराठा ही जमात मुळात लढाऊ वृत्तीची असल्याने एकमेव या भरतीत अन्य उमेदवारांच्या तुलनेत त्यांना काही सवलती दिलेल्या आहेत. इतर उमेदवारांना 170 सेंटिमीटर उंचीची अट असताना मराठा मुलांना 165 अशी आहे. तसेच इतरांना छाती 84 असताना मराठा मुलांना 80 सेंटिमीटर एवढी आहे. 1999 पासून प्रा. भोसले यांना पोलिस, सैन्यदलासाठी प्रशिक्षण देण्याचा अनुभव असून त्यांच्या शिकवणीतून आतापर्यंत 8 हजार मुले संरक्षणदलात नोकरीस लागली आहेत. गरजूंनी प्रा. भोसले (9527924646) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. 

"एक मराठा लाख मराठा' या घोषणांनी इतिहास घडवला आहे. आपण समाजाचे देणे लागतो, हे केवळ बोलून चालत नाही, तर त्यासाठी कृतीच हवी. यासाठी समाजातील तरुण मुलांसाठी आपण पुढे आलो. प्रारंभी औरंगाबादेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. नंतर त्या-त्या जिल्ह्यातील गरजा ओळखून प्रशिक्षण सुरू केले जाईल. समाजाने एकत्र येऊन इतिहास घडविल्यानंतर आपली जबाबदारी समजून आपण हे अभियान राबविणार आहोत. 
- प्रा. राजेश भोसले, पोलिस सैनिक प्रशिक्षण केंद्र