अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

लातूर - लातूरमधील एका जिमच्या उद्‌घाटनानंतर बुधवारी मुंबईला निघालेल्या अभिनेत्री सनी लिओनीच्या खासगी विमानाचा अपघात वैमानिकाच्या कौशल्यामुळे टळला.

लातूर - लातूरमधील एका जिमच्या उद्‌घाटनानंतर बुधवारी मुंबईला निघालेल्या अभिनेत्री सनी लिओनीच्या खासगी विमानाचा अपघात वैमानिकाच्या कौशल्यामुळे टळला.

सनी लिओनी लातूरमध्ये एका जिमच्या उद्‌घाटनासाठी आली होती. येथील कार्यक्रम आटोपून ती खासगी विमानाने दुपारी चारच्या सुमारास मुंबईला रवाना झाली; पण वाटेत खराब हवामानामुळे विमान कोसळण्याची किंवा धडकण्याची शक्‍यता होती; परंतु वैमानिकाने कौशल्याने परिस्थिती हाताळल्याने दुर्घटना टळली. त्याबद्दल सनीने ट्‌विट करून देवाचे आभार मानले आहेत.

पत्रकाराला धक्काबुक्की
दरम्यान, सनी लिओनीच्या कार्यक्रमात संयोजकांनी एका पत्रकाराला धक्काबुक्की केली. तसेच या कार्यक्रमाला परवानगी न घेता डीजे लावून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरात सनीला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यात येथील पत्रकार नितीन बनसोडे यांनी सनी लिओनीची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सचिन शेंडे व देविदास या दोघांनी बनसोडे यांना धक्काबुक्की व दमदाटी करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बनसोडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.