हिरव्या पावसानंतर आता निळी कुत्री; पनवेलमध्ये प्रदूषणाचा घातक विळखा

दीपक घरत
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

पनवेल : रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रदूषणामुळेही इथल्या प्राण्यांचा रंग बदलत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शरीराला चिकटणारा रंग चाटल्याने प्राण्यांना नाना आजार जडण्याची शक्‍यता आहे. या रंगांमुळे कुत्र्यांना कर्करोग किंवा दृष्टी गमावावी लागण्याची शक्‍यता आहे. 

पनवेल : रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रदूषणामुळेही इथल्या प्राण्यांचा रंग बदलत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शरीराला चिकटणारा रंग चाटल्याने प्राण्यांना नाना आजार जडण्याची शक्‍यता आहे. या रंगांमुळे कुत्र्यांना कर्करोग किंवा दृष्टी गमावावी लागण्याची शक्‍यता आहे. 

वायू आणि जलप्रदूषणाबद्दल नेहमीच चर्चेत असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषणाचा फटका आता प्राण्यांना बसू लागला आहे. विशेषत: श्‍वानांना याचा जास्त त्रास होत असल्याचे दिसत आहे. या परिसरात प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी सतत वाढत आहेत. त्यात श्‍वसनाचे आजार, उलट्या होणे यांचे प्रमाण जास्त आहे. काही दिवसांपासून येथील प्रदूषणामुळे कासाडी नदीतील माशांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. ही घटना ताजी असताना या वसाहतीमधील काही कारखान्यांत तयार होणाऱ्या रासायनिक उत्पादनांमुळे श्‍वानांना त्रास होऊ लागला आहे. काही ठिकाणी श्‍वानांचे रंगच बदलत आहेत. 

रासायनिक पुडमुळे हा रंग बदलत आहे. औद्योगिक परिसरातील काही कारखान्यांमध्ये कपड्यांना डाय करण्यासाठीचे रंग बनवण्यात येतात. या रंगांमुळे श्‍वानांच्या शरीराचे रंग बदलत आहेत. शरीराला लागणारा रंग श्‍वान जिभेने चाटून काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तो रंग त्यांच्या पोटात जातो. या रंगांमुळे श्‍वानांना ॲलर्जी झाल्यामुळे शरीराला खाज सुटते. जखमा होऊन, त्या चिघळतात. याचबरोबर रसायनांचे बारीक कण नाकावाटे श्‍वासनलिकेत अडकून बसत असल्याने त्यांना श्‍वसनाचे त्रास होतात. पोटात गेलेल्या रसायनांमुळे जुलाब, उलटी यांसारखे त्रास त्यांना वरचेवर होतात. रासायनिक रंगांमुळे त्वचारोग, कर्करोग, सूज येणे, किडनीचे आजार जडू लागले आहेत. असे रंग डोळ्यात गेल्याने दृष्टी जाण्याची भीती असते, अशी माहिती खारघरमधील शस्मित ॲनिमल केअर ॲण्ड सर्जरी सेंटरचे डॉक्‍टर अमित पाटील यांनी दिली.

निळ्या श्‍वानाने वेधले जगाचे लक्ष!
‘सकाळ’मध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाल्याबरोबर (११ ऑगस्ट २०१७) जगभरातील विविध प्रसारमाध्यमांनी याची दखल घेतली. भारतापासून सात हजार किलोमीटर अंतरावर असेलल्या नॉर्वे येथील डग्ब्लाडेट या प्रसिद्ध दैनिकात व पोर्टलवर ‘सकाळ’च्या हवाल्याने तळोजातील प्रदूषणाचा प्रश्‍न प्रसिद्ध करण्यात आला. याशिवाय जगभरातील विविध माध्यमांबरोबरच हिंदुस्तान टाइम्स, एशिया न्यूज यासारख्या वृत्तपत्रांनीही याबाबत ‘सकाळ’कडे विचारणा करून वृत्त दिले आहे; मात्र चार दिवसांनंतरही येथील जबाबदार अधिकाऱ्यांनी व राज्य सरकारनेही या घटनेची दखल घेतलेली नाही.

तळोजा औद्योगिक वसाहतीत सुमारे ३३० रासायनिक कारखाने आहेत. येथून वाहणारी कासाडी नदीही प्रदूषणामुळे दूषित झाली आहे. या नदीतील मासे अनेकदा मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसतात. ‘सकाळ’ने हे वास्तव वारंवार उघड केले होते. या प्रदूषणाचा परिणाम परिसरातील प्राण्यांवरही होऊ लागला आहे. औद्योगिक वसाहतीतील अनेक श्‍वानांचा मूळचा रंग प्रदूषणामुळे बदलून ते निळे झाल्याचे सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्याबरोबर जगभरातील विविध माध्यमांनी या वृत्ताची दखल घेतली. नॉर्वे येथील ‘डग्ब्लाडेट’ या प्रसिद्ध दैनिकाने ‘सकाळ’चा हवाला देऊन हे वृत्त नुकतेच प्रसिद्ध केले. ‘डग्ब्लाडेट’ हे नॉर्वेतील सर्वाधिक खपाचे दुसऱ्या क्रमांकाचे दैनिक आहे. या दैनिकाचे पत्रकार कार्ल मार्टिन जेकोबसन यांनी सांगितले, की स्थानिक भाषेत प्रसिद्ध करण्यात आलेली ही बातमी मोठ्या प्रमाणावर वाचली गेली.

श्‍वानांच्या बदललेल्या रंगाच्या वृत्ताची दखल घेत नॉर्वेनंतर आता अमेरिका, इंग्लंडमधील वॉशिंग्टन पोस्ट, स्क्रोल डॉट इन, वायरल प्रेस यूके या आघाडीच्या माध्यमांनी याबाबत ‘सकाळ’कडे विचारणा केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या प्रसिद्धिमाध्यमांनी येथील प्रदूषणाची दखल घेतल्याने आता हा मुद्दा जागतिक पातळीवर गेला आहे. गेली अनेक वर्षे या भागात प्रदूषणाचा कहर झाला आहे. रात्रीच्या वेळी अनेकदा तळोजा औद्योगिक वसाहतीच्या पाच ते १० किलोमीटर परिसरात हानीकारक रसायनांची दुर्गंधी पसरते. अनेकदा येथील ग्रामस्थांनी याबाबत आवाज उठवूनही सरकारी पातळीवर त्याची कोणतीच दखल घेतली न गेल्याने आता येथील प्रदूषणाचा मुद्दा या वृत्ताच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे.