समुद्रात 3500 कोटींचे हेरॉईन जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

तटरक्षक दलाची सर्वांत मोठी कारवाई

तटरक्षक दलाची सर्वांत मोठी कारवाई
मुंबई - गुजरात किनाऱ्याजवळ समुद्रात दीड हजार किलो हेरॉईन या अमली पदार्थाचा साठा तटरक्षक दलाच्या पथकाने शनिवारी (ता. 29) जप्त केला. "एमव्ही हेन्री' या व्यापारी बोटीतून हा साठा जप्त करण्यात आला. रविवाही ही बोट पोरबंदर समुद्रात आणण्यात आली. या बोटीवरील आठ खलाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा साठा कुठे नेण्यात येणार होता, याचा तपास सुरू आहे.

पोरबंदरच्या समुद्रात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती "नॅशनल टेक्‍निकल रिसर्च ऑर्गनायझेशन'ने 27 जुलैला दिली होती. त्यानंतर नौदल, तटरक्षक दल, गुप्तचर संस्था, स्थानिक पोलिस तसेच सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना अटक करण्याच्या दृष्टीने रणनीती आखली होती. शनिवारी एका जहाजावरील हालचाली संशयास्पद आढळल्याने तटरक्षक दलाच्या राज्य मुख्यालयातून या जहाजावरील हालचालींवर पाळत ठेवण्यात आली.

त्यानंतर छोट्या बोटीच्या साह्याने बोटीत प्रवेश करून हा अमली पदार्थाचा साठा पकडला. सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी "हेन्री' ही बोट नेटवर्कवर स्वतःची ओळख "प्रिन्स 2' अशी दाखवत होती, तर मरीन ट्रॅफिक यंत्रणेवर या बोटीने "अल सादिक' अशी दाखवली होती.