ऐतिहासिक वारशाची रया गेली

श्रद्धा पेडणेकर
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

मुंबई - ऐतिहासिक किल्ल्यांची भव्यता सर्वांनाच आकर्षित करते. महानगरी मुंबईतही असे किल्ले आहेत; पण अनेकांना त्याबाबत माहिती नाही. पर्यटनाच्या दृष्टीनेही त्या किल्ल्यांना महत्त्व आहे; परंतु त्यांची स्थिती वर्षानुवर्षे सुधारलेली नाही. त्यात उजवा ठरतो तो वांद्रे किल्ला. तो आपले रूपडे काहीसे बदलत असला तरी अनेक घोषणा करूनही शिवडी आणि वरळी किल्ल्यांची स्थिती ‘जैसे थे’च आहे. मुंबईतील किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा मोकळ्या श्‍वासाच्या प्रतीक्षेत आहे.

मुंबई - ऐतिहासिक किल्ल्यांची भव्यता सर्वांनाच आकर्षित करते. महानगरी मुंबईतही असे किल्ले आहेत; पण अनेकांना त्याबाबत माहिती नाही. पर्यटनाच्या दृष्टीनेही त्या किल्ल्यांना महत्त्व आहे; परंतु त्यांची स्थिती वर्षानुवर्षे सुधारलेली नाही. त्यात उजवा ठरतो तो वांद्रे किल्ला. तो आपले रूपडे काहीसे बदलत असला तरी अनेक घोषणा करूनही शिवडी आणि वरळी किल्ल्यांची स्थिती ‘जैसे थे’च आहे. मुंबईतील किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा मोकळ्या श्‍वासाच्या प्रतीक्षेत आहे.

वांद्रे किल्ला सजतोय; पण युगुलांचा विळखा
 वांद्रे बॅण्डस्टॅण्डच्या टोकाला पंचतारांकित हॉटेल असलेल्या ताज लॅण्डच्या बाजूलाच वांद्र्याचा किल्ला आहे. तुटलेल्या पायऱ्या आणि कचऱ्याचे साम्राज्य असे त्याचे स्वरूप होते; मात्र वांद्रे रहिवासी संघ आणि पुरातत्त्व विभागाने काही प्रमाणात केलेल्या कामामुळे किल्ला काहीसा कात टाकतोय; मात्र अजूनही किल्ला असल्याची त्याची माहिती इथे मिळत नाही.

पायऱ्या सुस्थितीत आहेत. कचराही आहे; परंतु तुरळक ठिकाणी सिमेंटचे बाकडे, कठड्यांना तारांचे कुंपण आणि झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या तरी किल्ल्याची स्थिती सुधारल्याचे चित्र आहे; मात्र कुंपणाच्या बाहेर पर्यटकांनी टाकलेल्या बाटल्यांचा खच दिसतो. अजूनही काही ठिकाणी तटबंदीचा भाग तुटलेला आहे.

वांद्रे किल्ला प्रेमीयुगुलांचा हॉटस्पॉट बनला आहे. त्यामुळे किल्ल्याचा प्रत्येक भाग अन्‌ भाग आणि कोपरा न्‌ कोपरा युगुलांनी काबीज केल्यामुळे किल्ल्यावर स्वच्छंदपणे फिरता येत नाही. 

वांद्रे किल्ल्यावरून अत्यंत नयनरम्य असा वांद्रे सी लिंक दिसतो. त्याच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नाही. कठड्यावर चढून जीव धोक्‍यात घालून सेल्फी काढला जातो. किल्ल्याची अवस्था जरी सुधारत असली तरी सुरक्षारक्षक नसल्यामुळे युगुलांच्या त्रासाबरोबरच अस्वच्छतेचा धोका आहे.

वरळी किल्ल्यात कचराच कचरा 
 तटरक्षक दलाच्या इमारतीकडून सरळ आत शिरले की वरळी गावातल्या गल्ल्यागल्ल्यांमधून थेट टोक गाठल्यावर किल्लासदृश वास्तू दिसते ती म्हणजे वरळीचा किल्ला. किल्ल्याच्या रस्त्यावर स्वागताला कचऱ्याचा ‘गालिचा’ पसरलेला असतो. किल्ल्याच्या पायऱ्यांवर दिवाळीतील फटाक्‍यांच्या कचऱ्याचा  खच पडलेला आहे. 

किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नसल्याने अतिक्रमणाला आयते आंदण कसे मिळते त्याचे बोलके उदाहरण दिसते. किल्ल्याच्या एका बाजूला वरळी सी-लिंकचे लोभसवाणे रूप दिसत असले तरीही दुसऱ्या बाजूकडून परिसराचा झालेला कचरा डेपो अंगावर येतो. 

 बाटल्यांचाही खच दिसतो. किल्ल्याच्या अनेक भागांत भेगा पडल्या आहेत. काही भागांची पडझड झाली आहे. तो भाग अजूनही डागडुगीच्या प्रतीक्षेत आहे. 
 किल्ल्यामध्ये व्यायामशाळा, मंदिर असा स्थानिकांचा थाट आहे. त्यामुळेच की काय काही प्रमाणात पहिल्या मजल्यावर किल्ल्याच्या अंतर्गत भागातील स्वच्छता काही प्रमाणात राखली गेली आहे असे वाटत असतानाच किल्ल्याच्या वरच्या मजल्यावर उरलेली लाकडे, बांधकाम केलेले सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून येते.

शिवडी किल्ला अस्वच्छतेच्या गर्तेत
 मुंबईतील अत्यंत महत्त्वाचे आणि फ्लेमिंगोंचे विहंगम दृश्‍य बघण्याची सुवर्णसंधी मिळते ते ठिकाण म्हणजे शिवडीचा किल्ला. राज्य सरकारच्या वतीने कितीही घोषणा केल्या गेल्या असल्या तरीही शिवडी रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर किल्ला गाठण्यासाठी अजूनही मेहनत घ्यावी लागते. किल्ला परिसरात अजूनही ठळकपणे दिसतील असे वा स्थानक परिसरातून माहिती मिळतील असे कोणतेही दिशादर्शक नाहीत. परिसरात गेल्यानंतरही इथे आजूबाजूला किल्ला असल्याच्या कोणत्याही खुणा नाहीत. 

थोड्याफार डागडुजीव्यतिरिक्त किल्ल्याची परिस्थितीही अनेक वर्षे तशीच आहे. किल्ल्यावर पाय ठेवल्या ठेवल्या तिथले रहिवासी ‘इदर लेडीज लोगों को अलाऊड नही है’ असे बिनधास्त सांगतात.

भकास किल्ला, वाढलेले गवत, किल्ल्यावर असलेले गर्दुल्ले, सरकारच्या वतीने करण्यात आलेले जुजबी काम, अस्वच्छता आदी समस्या ठळकपणे दिसतात. एकट्या-दुकट्या महिलेसाठी अत्यंत असुरक्षित अशीच परिस्थिती शिवडी किल्ल्यावर आहे. अत्यंत चांगली वास्तू सध्या बेवारस अवस्थेत असून, सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.