नालेसफाईबाबतचे दावे फोल; टीम सकाळ करणार सफाईचे ऑडिट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

मुंबईतील ८६ टक्के नालेसफाई केल्याचा दावा महापालिका प्रशासन करत असले, तरी अनेक नाले अजूनही गाळातच आहेत हे वास्तव टीम ‘सकाळ’ने शोधले. मालाड-मालवणीतील नाल्यांमध्ये अनेक आठवड्यांपासून राडारोडा पडून आहे. मीठ चौकी नाल्याची सफाई झाली असली तरीही त्यात गाळ आहे.

मुंबई : मुंबईतील ८६ टक्के नालेसफाई केल्याचा दावा महापालिका प्रशासन करत असले, तरी अनेक नाले अजूनही गाळातच आहेत हे वास्तव टीम ‘सकाळ’ने शोधले. मालाड-मालवणीतील नाल्यांमध्ये अनेक आठवड्यांपासून राडारोडा पडून आहे. मीठ चौकी नाल्याची सफाई झाली असली तरीही त्यात गाळ आहे. मुंबईतील अनेक नाल्यांची अवस्था अशीच आहे. काही मुख्य नाल्यांची सफाई झाली असली तरी बहुसंख्य अंतर्गत नाले मात्र अद्यापही कचऱ्याने ओसंडत आहेत. या वस्तुस्थितीकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सकाळचा हा खास प्रयत्न, ऑडिट मुंबईतील नाल्यांचे...

  •  लांबी दीड किलोमीटर सफाई झालेली नाही.
  •  तोडलेल्या झोपड्यांचा राडारोडा नाल्याच्या काठावरच  
  •  नाल्यातून ठराविक ठिकाणचा गाळ कमी प्रमाणात काढला
  •  नाल्यामुळे दरवर्षी पाणी तुंबते. यंदाही भीती

या नाल्याची सफाई फक्त दाखवण्यापुरती झाली आहे. आजही त्यात गाळ आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- गणेश क्षीरसागर, जुने कलेक्‍टर कंपाऊंड

गाळ उपसण्यात आला; मात्र नाल्याकडे पाहिल्यावर तसे जाणवत नाही. पूर्वी होता तेवढाच गाळ आजही दिसतो आहे.
- रुबिना खान, गेट क्रमांक सहा

यंदाही नालेसफाईच्या नावाने बोंबच आहे. यंदाही पाणी तुंबण्याची भीती आहे.
- संतोष चिकणे, मालवणी

नालेसफाईवर झालेला खर्च
वर्ष    खर्च (कोटीत)
२०१३-१४    ६०
२०१४-१५    १००
२०१६-१७    ५१
२०१७-१८    १२० (तरतूद)
(२०१५-१६ मध्ये दोन वर्षांसाठी १५० कोटी रुपयांचे नालेसफाईचे कंत्राट देण्यात आले होते; मात्र गैरव्यवहार झाल्यामुळे ते रद्द करण्यात आले.)

प्रशासनाचा निषेध करत स्थायी समिती तहकूब
मुंबई - नालेसफाईची मुदत बुधवारी (ता. ३१) संपत आहे. ९५ टक्‍के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पावसाला कधीही सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. तरीही नालेसफाई अपूर्ण आहे. त्यामुळे मुंबईत पावसाचे पाणी तुंबण्याचा धोका आहे. महापालिका प्रशासनाची निष्क्रियता आणि बनवाबनवीचा निषेध करत मंगळवारी स्थायी समितीची बैठक एकमताने तहकूब करण्यात आली.

मिठी नदी २० टक्के साफ
मिठी नदीची अवघी २० टक्के सफाई झाली आहे. नदीतून दोन हजार ८८३ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने मात्र धारावी परिसरातील मिठी नदीची १०५ टक्के सफाई झाल्याचा दावा केला आहे. नाल्यांमधून एक लाख ६६ हजार ५२२ मेट्रिक टन गाळ काढण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

नालेसफाईचा टक्का
शहर : ८०.६८ टक्के
पश्‍चिम उपनगर : ८२.०८ टक्के
पूर्व उपनगरे : ९७.४३ टक्के