मुंबई: बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

शुक्रवारी सायंकाळी पोलिस नियंत्रण कक्षात फोन आला. मनोज नावाचा व्यक्ती मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असून तो नालासोपाराला राहतो असे सांगून आदित्यने फोन कट केला. मनोजने उत्तर प्रदेशमध्ये तीन जणांची हत्या केली असून तो घातक आहे. या नंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली.

मुंबई - 1993 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची शुक्रवारी (ता.16) टाडा न्यायालयात सुनावणी दरम्यान शहरात बॉम्बस्फोट घडवणार असल्याचा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन आला. उत्तर प्रदेशहून हत्येच्या गुन्हयातील आरोपी मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष 9 च्या पोलिसांनी काही वेळातच फोन करणाऱ्याला ताब्यात घेतले. आदित्य नागर उर्फ अभिमन्यु असे त्याचे नाव आहे. त्याला पुढील तपासाकरता जुहु पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. 

शुक्रवारी सायंकाळी पोलिस नियंत्रण कक्षात फोन आला. मनोज नावाचा व्यक्ती मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असून तो नालासोपाराला राहतो असे सांगून आदित्यने फोन कट केला. मनोजने उत्तर प्रदेशमध्ये तीन जणांची हत्या केली असून तो घातक आहे. या नंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली. या घटनेची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. कक्ष 9 च्या अधिकाऱ्यांनी फोन करणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहितीवरून फोन करणारा हा खार परिसरात असल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी आदित्यला ताब्यात घेतले.

आदित्यचा मनोज सोबत वाद होता. त्याला धडा शिकवण्याकरता आदित्यने दारूच्या नशेत फोन पोलिस नियंत्रण कक्षात फोन केला होता. रात्री उशीरा आदित्यला पुढील तपासाकरता जुहु पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.