बिबट्याला पकडण्यासाठी 'ट्रॅप कॅमेरे', 'शार्प शूटर'

शिवनंदन बाविस्कर
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

वन विभागाची कठोर पावले; बिबट्यासाठी एकूण सहा पिंजरे

पिलखोड (ता. चाळीसगाव) :  पिंपळवाड म्हाळसा(ता. चाळीसगाव) शिवारात महिलांवर झालेल्या हल्ल्यांची गंभीर दखल घेत वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी 'ट्रॅप कॅमेरे' लावण्यात आले असून 'शार्प शूटर' यांना पाचारण करण्यात आले आहे. 

'गिरणा' परिसरात थैमान घातलेल्या बिबट्याने पिंपळवाड म्हाळसा येथे एका महिलेला ठार तर एका महिलेला जखमी केले आहे. या सततच्या घडणाऱ्या घटनांंमुळे वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी आता कठोर पावले उचलली आहेत. बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी पिंपळवाड म्हाळसा शिवारात 5 'ट्रॅप कॅमेरे' लावण्यात आले आहेत. शिवाय बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी गणेश गवळी व सुनिल पवार या दोन 'शार्प शूटर' यांना पाचारण करण्यात आले आहे. 

काल(ता.28) दुपारी आमदार उन्मेष पाटील, प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी संजय एस. मोरे, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे व जळगावचे वन्यप्राणी अभ्यासक विवेक देसाई यांनी त्या शिवाराची पाहणी केली. त्यानंतर कॅमेरे लावण्यात आले. तसेच आणखी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. यामुळे पिंपळवाड म्हाळसा शिवारात बिबट्याला पकडण्यासाठी एकुण सहा पिंजरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता तरी बिबट्या वन विभागाच्या जाळ्यात येईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, रोहन सुर्यवंशी, वनरक्षक प्रकाश पाटील, वन कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

समजा, या शिवारात जर कुठल्या पाळीव प्राण्याची शिकार झाली. तर ती शिकार शेतकऱ्यांनी तेथून न उचलता तेथेच पडु द्यावी. कारण बिबट्या रात्रीच्या सुमारास ती शिकार खाण्यासाठी परत येईल, त्यावेळी आपण शार्प शूटरला एका पिंजर्यात बसवून बिबट्याला शुट करुन बेशुद्ध करता येऊ शकते.
- संजय एस. मोरे, प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव.