ठिबकसाठी समूह ऊस शेती हाच पर्याय

ठिबकसाठी समूह ऊस शेती हाच पर्याय

कोल्हापूर - विभक्त कुटुंब व्यवस्था, त्यातून जमिनीच्या झालेल्या वाटण्या, नदीकाठावर असलेली ऊस शेती यांमुळे ऊस पिकासाठी ठिबक सिंचनसाठी समूह हाच पर्याय होऊ शकतो. जिल्ह्यात याच माध्यमातून कारभारवाडी (ता. करवीर) येथील १५० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शंभर एकर क्षेत्रात ही योजना राबवली आहे. त्यांचाच आदर्श घेण्याची गरज आहे. 

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसासाठी ठिबक सिंचन बंधनकारक करण्याचा निर्णय झाला आहे. या योजनेखाली शासन ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के अनुदानही देणार आहे. अनुदानाची ही पद्धत पूर्वीपासूनच चालू आहे; पण ठिबकची सक्ती नसल्याने याकडे शेतकऱ्यांचा कल नव्हता. 

जिल्ह्यात ऊस हे मुख्य पीक आहे. कमी मशागत, कमी खर्च, नदीकाठी असणारे पाणबुडी क्षेत्र यामुळे जिल्ह्यात इतर पिकांच्या तुलनेत शेतकरी ऊस पिकवण्यालाच प्राधान्य देत आहेत. त्यात जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून अलीकडच्या काही वर्षांत दिला जाणारा चांगला दर हेही त्यामागचे कारण आहे. 

ऊस लागवडीत भाजीपाला व इतर आंतरपिके घेऊन त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा म्हणूनही शेतकऱ्यांनी तो स्वीकारला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्याचा ठिबक सिंचनाच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला तर जिल्ह्यात ऊस पिकाची बहुतांशी शेती ही नदीकाठी आहे. पावसाळा सुरू झाला की, पाणीपुरवठा योजनांचे पंप ज्याप्रमाणे काढावे लागतात, त्याचप्रमाणे ठिबकची यंत्रणाही गुंडाळून ठेवावी लागणार आहे. दरवर्षी हे काम करण्यास शेतकरी तयार होतील की नाही, हा पहिला प्रश्‍न आहे. दुसरीकडे विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे वडिलोपार्जित शेतीचे वाटणीमुळे चार-पाच तुकडे झाले आहेत. एखाद्या कुटुंबाकडे चार-पाच एकर जमीन असेल आणि त्या कुटुंबाच्या वाटण्या झाल्या असतील तर त्याचे एक एक एकरचे तुकडे पडणार आहेत. ठिबक सिंचन राबवण्याच्या दृष्टीने कमी क्षेत्रात जादा खर्च होणार आहे. 

कृषी विभागाकडील माहितीनुसार एक एकर क्षेत्रातील ठिबक सिंचनसाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. नावावर एक एकरच क्षेत्र असलेला शेतकरी एवढे पैसे खर्च करण्याच्या मानसिकतेत नाही. शेतीच्या वाटण्या झाल्या असल्या तरी दोन भावांची जमीन एकमेकांच्या जमिनीला लागूनच आहे. अशा परिस्थितीत गावांतील किंवा शेजारी शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ठिबक सिंचन राबवणे हेच सोयीचे ठरणार आहे.

कारभारवाडीचा आदर्श
करवीर तालुक्‍यातील कारभारवाडी या छोट्या गावातील १५० शेतकरी एकत्र आले. त्यांनी एक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून गावातील सुमारे शंभर एकर उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यात आले आहे. या योजनेला नाबार्डचे अनुदान व कर्ज पुरवठाही आहे. जिल्ह्यातील ठिबक सिंचन राबवताना या गावाचा आदर्श घेण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com