परीक्षाविषयक माहिती खंडरूपात

संदीप खांडेकर
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

अभ्यासक्रमाचे नाव, भाग, सेमिस्टर, विषयांचे कोडनिहाय नाव, परीक्षांच्या वेळा यांची एकत्रित माहिती खंडाच्या स्वरूपात शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केली आहे. या पद्धतीचा खंड तयार करणारे शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांकरिता परीक्षाविषयक ही माहिती विद्यापीठाच्या वेबपोर्टलवर उपलब्ध केली आहे. 

कोल्हापूर -  अभ्यासक्रमाचे नाव, भाग, सेमिस्टर, विषयांचे कोडनिहाय नाव, परीक्षांच्या वेळा यांची एकत्रित माहिती खंडाच्या स्वरूपात उपलब्ध झाली, तर त्या विद्यापीठाचे कौतुक कोण करणार नाही? त्यामुळे महाराष्ट्रात असे एखादे विद्यापीठ आहे का, अशी विचारणा होणे साहजिक आहे. इतके चांगले पाऊल कोणत्या विद्यापीठाने उचलले? मुंबई की पुणे विद्यापीठाने, असा भुवया उंचावणारा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो. विशेष हे, की असा खंड दुसऱ्या-तिसऱ्या विद्यापीठाने नव्हे तर शिवाजी विद्यापीठाने बनवला आहे.

या पद्धतीचा खंड तयार करणारे शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांकरिता परीक्षाविषयक ही माहिती विद्यापीठाच्या वेबपोर्टलवर उपलब्ध केली आहे. 
या खंडात ऑक्‍टोबर-२०१७ मधील परीक्षांच्या वेळापत्रकांचा समावेश आहे. चार ऑक्‍टोबर ते २९ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा अंतर्भाव आहे. खंड २९५ पानांचा आहे.

महाविद्यालयांकरिता आवश्‍यक असलेली अभ्यासक्रमनिहाय, विषयनिहाय, सत्रनिहाय माहिती खंडात दिली आहे. त्याच्या आधारे महाविद्यालयातील संबंधित घटकांना परीक्षांचे नियोजन करणे सोपे होईल. विद्यापीठातील परीक्षा विभागाकडे सातत्याने विचारणा करावी लागणार नाही. ऑक्‍टोबर- २०१७ हिवाळी सत्रातील ५६८ परीक्षांच्या संकलित संपूर्ण वेळापत्रक दोन खंडांत प्रकाशित केले जात आहे. त्याच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन झाले असून त्याच्या सॉफ्ट कॉपी महाविद्यालयांत पाठविल्या आहेत.

परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाने केलेल्या सुधारणा महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. एकूण प्रश्नपत्रिकांपैकी ३३०० प्रश्नपत्रिका ऑनलाइन वितरणाचे काम परीक्षा विभागाने केले आहे. परीक्षा केंद्रनिहाय प्रश्न पत्रिकांची पाठवणूक, विकेंद्रित उत्तरपत्रिका तपासणी केंद्रे यामुळे परीक्षांचे नियोजन बिनचूक काटेकोर पद्धतीने केले जात आहे. दुसरा खंड लवकरच प्रकाशित केला जाणार आहे. सुमारे सहा हजार विविध विषयांच्या ५६८ सत्रांच्या परीक्षा विद्यापीठाकडून घेतल्या जातात. 

नॅक मूल्यांकनासाठी महत्त्वाचे
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे म्हणाले, ‘‘नॅक मूल्यांकनाच्या दृष्टीने हे खंड महत्त्वाचे ठरणार आहेत. परीक्षांचे डॉक्‍युमेंटेशन खंडाच्या माध्यमातून आकाराला आले आहे. प्रत्येक प्राचार्यांच्या मेलवर परीक्षाविषयक माहिती पाठवली आहे.’’

अभिनव उपक्रम
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, ‘‘विद्यार्थी केंद्रीत हा अभिनव उपक्रम आहे. परीक्षांचे नियोजनासाठी खंड उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ एक ॲपसुद्धा उपलब्ध करत आहे. ज्यावर विद्यार्थ्याने त्याचा पीआरएन नंबर टाकल्यावर त्याला त्याच्या परीक्षेचे वेळापत्रक पाहता येईल.’’