किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी प्राधिकरण

निखिल पंडितराव
सोमवार, 31 जुलै 2017

कोल्हापूर - दुर्गराज रायगडचे संवर्धन करण्यासाठी आता सरकारच्या वतीने रायगड प्राधिकरण स्थापण्याच्या हालचाली सुरू आहेत. रायगड संवर्धन देशातील दुर्ग अभ्यासकांसाठी एक आदर्श ठरावा आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांची या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्‍यता आहे.

खासदार संभाजीराजे यांनीच 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास सुरवात केली. मुहूर्तमेढ रोवल्यानंतर काही वर्षात हा सोहळा लोकोत्सव बनला. 2005 पासून हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. या माध्यमातूनच खासदार संभाजीराजे यांनी रायगडचे संवर्धन करण्याची मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 600 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या शिवभक्तांसह इतिहास अभ्यासक, संशोधकांची संख्या पाहून गतवर्षी रायगडाच्या संवर्धनासाठी हा निधी जाहीर झाला. पहिल्या टप्प्यातील विकासकामांना सुरवात झाली. 150 ते 200 कोटी रुपये रायगडाच्या संवर्धनासाठी खर्च होतील. उरलेली रक्कम रस्ते, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी खर्च होईल. पर्यटनासाठीही या ठिकाणी मोठी सोय केली जाणार आहे, पण ही सर्व कामे करत असताना त्यावर देखरेख ठेवणे किंवा आलेल्या निधीचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासनाने रायगड प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी अनुकूल आहेत. त्यांनी या अनुषंगाने चर्चा करून माहिती ही घेण्यास सुरवात केली आहे. प्राथमिक बैठकीत चर्चेनुसार हे प्राधिकरण स्थापन करून खासदार संभाजीराजे यांच्याकडे अध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

राज्यातील पाच किल्ल्यांचे संवर्धन
रायगडप्रमाणेच पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी खासादार संभाजीराजे आग्रही आहेत. यासाठी त्यांनी प्रयत्न ही सुरू केले आहेत. रायगडप्रमाणे निधी मिळवून पाच किल्ल्यांचे संवर्धन करून नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.