पंखांत ठेवूनी बळ... भरारी घ्यायचीय मला...

संदीप खांडेकर
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

कुस्तीत करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा वातानुकूलित हॉल वडणगेमध्ये आकार घेत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील हा पहिला हॉल असून आठ दिवसांत त्याचे काम पूर्ण होत आहे. 

कोल्हापूर ः ‘नको व्यर्थ चिंता, टाक मागे क्षणाला 
होऊनी वादळ, भीड तू गगनाला 
सोस टाकीचे घाव, तू नको थांबू आता 
नको जिद्द सोडू, नको तू हार मानू
पंखांत ठेवूनी बळ, सांग जगाला 
भरारी घ्यायचीय मला...’

या ओळी सार्थ ठरविण्याची धडपड वडणगे (ता. करवीर) येथील कुस्तीपटू रेश्‍मा ऊर्फ सुगंधा अनिल माने हिची सुरू आहे. घरातील देव्हाऱ्यात कुलदैवत तुळजाभवानीसह अन्य देव-देवतांच्या मूर्तींसोबत तिने ऑलिंपिक-२०२० मध्ये सुवर्णपदक घेण्याचे स्वप्न कागदावर लिहून ते चिकटवले आहे. विशेष म्हणजे तिच्यासह कुस्तीत करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा वातानुकूलित हॉल वडणगेमध्ये आकार घेत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील हा पहिला हॉल असून आठ दिवसांत त्याचे काम पूर्ण होत आहे. 

रेश्‍मा ही ध्येयवेडी असून कुस्ती हेच आयुष्य तिने मानले आहे. तिचा भाऊ अतुल व अमोल, चुलत भाऊ ऋषीकेश व चुलत बहीण रूपाली हेही कुस्ती करतात. त्यांची कुस्तीतील धडपड पाहून माने कुटुंबीयांनी वडणगेमध्येच  त्यांच्यासाठी ‘श्रीमंत छत्रपती शाहू महाराज’ नावाने तालीम बांधली. छत्रपती घराण्यानेसुद्धा तिला काही कमी पडणार नाही, याची पूरेपूर दक्षता घेतली. ऑलिंपिकचे स्वप्न साकार करायचे, तर मॅटवर सातत्याने सराव करणे आवश्‍यक आहे. तिची ही अडचण लक्षात घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिच्यासाठी बांधलेल्या तालमीच्या जागेतच आंतरराष्ट्रीय दर्जाचा वातानुकूलित ४० बाय ४० फूट हॉल बांधण्यासाठी पुढाकार घेतला. हॉलसाठी लागणाऱ्या पैशाची बाजू त्यांनी उचलली. सहा महिने त्याचे काम सुरू आहे.

हॉलसाठी जर्मनीहून मॅट मागविले. २० बाय  १८ फूट जागेत अत्याधुनिक मशिनरींची व्यायामशाळा केली जात आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षकाला राहण्यासाठी स्वतंत्र खोली आहे. ३० फूट उंचीचा रोपही उभारला. सुमारे पंधरा कामगार हॉलचे काम वेगाने पूर्ण करत आहेत. भविष्यात येथे वसतिगृह स्थापन करण्याचा विचार आहे. 

वाढाव्यात कुटुंबीय करतात देखरेख
आंतरराष्ट्रीय दर्जाचा हॉल होत असल्याने त्यावर रेश्‍माचे आजोबा राजाराम माने, वडील अनिल, चुलते भीमराव यांची देखरेख आहे. माने कुटुंबीयांतील प्रत्येकाने कामांचे वाटप करून घेतले आहे. आजी रत्नाबाई व भीमराव हे भवानी मंडपातील रसवंती गृह चालवितात, तर आजोबा राजाराम म्हशींचा सांभाळ करतात. अनिल माने कुस्तीच्या सरावावर देखरेख ठेवतात. त्यांची पत्नी व वहिनी घरकाम सांभाळतात.

देव्हाऱ्यात सुवर्णपदक मिळविण्याचा कागद
पदके, प्रमाणपत्रे, सन्मानपत्रांनी मानेंच्या घरातील कपाट भरलेय. भिंतीवर रेश्‍माचे ‘आयडॉल’ अक्षयकुमार व सचिन तेंडूलकर यांच्या छायाचित्रांसह साक्षी मलिक, पी. व्ही. सिंधू, विनेश फोगट यांची छायाचित्रे भिंतीवर चिकटवली आहेत. माजघरात २०१८ मध्ये होणाऱ्या स्पर्धा व त्यात कोणते पदक मिळवायचे, याचा उल्लेख असलेला मोठा कागद चिकटवला आहे. विशेष म्हणजे देव्हाऱ्यात देवतांच्या मूर्तींसह रेश्‍माने ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याच्या निर्धाराचा कागद चिकटवला आहे.

परदेशातील थंड वातावरणात तेथील कुस्तीपटू सराव करतात.ते कित्येक तास न थकता लढती करतात. भारतीय कुस्तीपटू उष्णात असल्याने  थोड्या सरावानंतर घामाघूम होतो. ज्या देशात कुस्ती आहे, त्या देशातील हवामानाचा अंदाज घेऊन सराव करणे महत्त्वपूर्ण असते. वडणगेसारख्या ग्रामीण भागात वातानुकुलित हॉल होत असल्याने तो कुस्तीपटूंसाठी पोषकच ठरेल. 
 - राम पवार, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक.

सरावासाठी वडणगेतून कोल्हापूरला जाण्या-येण्यात वेळ जातो. हॉल पूर्ण झाल्यानंतर हा वेळ मला सरावासाठी उपयुक्त ठरेल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे ग्रामीण भागातील मुलींसाठी आंतरराष्ट्रीय सोयी-सुविधा असलेला हॉल तयार होत असल्याचा आनंद मोठा आहे.
- रेश्‍मा माने,
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू