बागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास 

सुधाकर काशीद
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - परदेशातून आणलेल्या चॉकलेट, बिस्किटाचे आपल्याला खूप अप्रूप असते; पण कोल्हापुरात तयार होणाऱ्या रोट या बिस्किटासारख्या खाद्य प्रकाराला सौदी अरब देशात अप्रूप आणि कौतुकाची पावती मिळत असेल तर? आणि तसेच घडते आहे. येथील बागवान गल्ली आणि भोई गल्लीत तयार होणारे रोट हाज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या आहाराचा एक घटक बनले आहेत. हाज यात्रा हे केवळ एक निमित्त; पण कोल्हापुरी रोटचा हा प्रवास रोटइतकाच खुसखुशीत ठरला आहे. एक घरगुती छोटा व्यवसाय केवळ आपल्या चवीच्या गुणावर सातासमुद्रापार कसा पोचू शकतो याचेच हे उदाहरण मानले जात आहे. 

बिंदू चौकासमोरच एकमेकाला लागून बागवान गल्ली व भोई गल्ली अशा दोन छोट्या गल्ल्या आहेत. त्यांतल्या बागवान गल्लीत इमाम पठाण रोटवाले व भोई गल्लीत इरफान शेख यांचा रोटचा व्यवसाय आहे. हा रोट गहू, दूध, गूळ, साखर, खजूर पावडर, सुका मेवा, खवा यांच्या मिश्रणातून केला जातो व लाकूड जाळून तयार होणाऱ्या उष्णतेवरच भाजला जातो. ही सर्व प्रक्रिया कोणत्याही आधुनिक यंत्राचा आधार न घेता केवळ हाताच्या कौशल्यावर केली जाते. त्यातून खरपूस रोट आकाराला येतो व त्यात पाण्याचा अंश नसल्याने पुढे महिना-दोन महिना टिकतो. 

हाज यात्रेसाठी जाणारे बहुतेक जण सोबत हेच रोट घेऊन जातात. कारण दोन रोट दुधासोबत खाल्ले की, ते दिवसभरासाठी पोटाचा आधार ठरू शकतात. न बाधणारा, न खराब होणारा भारतीयांच्या दृष्टीने खाण्यातला खुसखुशीत व पौष्टिक असलेला हा रोट त्यामुळेच लोकप्रिय झाला आहे. आता तर मोठ्या हॉटेलातही काऊंटरवर हा रोट दिमाखात विराजमान झाला आहे. 

बागवान गल्लीत पठाण व भोई गल्लीत शेख कुटुंबीय हे रोट बनवण्यात गर्क असतात. सर्व रोट हातानेच करायचे असल्याने नग कमी होतात. त्यामुळे आगाऊ ऑर्डर नोंदवून ते घ्यावे लागतात. इतर वेळी ते सुटे मिळू शकतात. 

गेल्या दोन पिढ्या छोट्या गल्लीत, छोट्या कुटुंबांत रोट बनवण्याचे हे काम चालू आहे. अर्थात यापूर्वी त्याची ओळख मर्यादितच होती व तयार करण्याची मर्यादाही कमी होती. आता मात्र या रोटला सातासमुद्रापार खवय्ये मिळाले आहेत. मऊ रोट, व्हाईट रोट, मधुमेहींसाठी साखर व गूळविरहीत रोट असे त्याचे प्रकार आहेत. परदेशात नेण्यासाठी त्याची प्लास्टिक व कागदी पिशवीत वेगळी बांधणी केली जाते. केवळ मुस्लिमच नव्हे, तर इतरही लोक एक पौष्टिक व खूप दिवस टिकणारा पदार्थ म्हणून या रोटाला प्राधान्य देत आहेत. 

भटकंती करताना आवश्‍यक 
विशेषत- जंगल, दरी, खोरी यात भटकंती करणाऱ्यांच्या सॅकमध्ये रोट हा घटक मानाचा ठरला आहे. आधुनिक काळात एखाद्या मोठ्या फूड इंडस्ट्रिजमधल्या हवाबंद खाद्य पदार्थाची मोठी जाहिरात असते; पण रोट हा एक घरगुती पदार्थ या साऱ्या स्पर्धेत एक वेगळी ओळख तयार करणारा ठरला आहे. 

लाकडी भट्टीतच भाजतात 
ओव्हनमध्येही इतर बिस्किटे भाजली जातात; पण लाकडाच्या भट्टीत तयार होणाऱ्या उष्णतेवर भाजल्या जाणाऱ्या बिस्किटाला, पावाला वेगळी चव असते. तोच प्रकार रोटाच्या बाबतीत आहे. रोट लाकडी भट्टीतच भाजले जातात.