उत्पादकांच्या हितासाठीच दूध दर कमी - विश्‍वास पाटील

उत्पादकांच्या हितासाठीच दूध दर कमी - विश्‍वास पाटील

कोल्हापूर - ‘दूध खरेदी दरात दोन रुपयांनी कपात केली नसती तर संघावर ४० कोटींचा भुर्दंड बसला असता, उत्पादकांकडून दिवसाआड (बसपाळी) दूध खरेदी करावे लागले असते. उत्पादकांचेच सुमारे ७५ लाखांचे नुकसान झाले असते. त्यामुळे दर कमी केले. खरेदी दरात कपात केली असली, तरीही राज्यात अजूनही खरेदी दरात गोकुळच आघाडीवर आहे.’’, असे गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, ‘‘आमदार सतेज पाटील यांनी गोकुळबाबत काही प्रश्‍न उपस्थित केले. त्यात गायीच्या दूध दरात २ रुपयांनी कपात केल्यामुळे शेतकऱ्यांना रोज १० ते १२ लाखांचा फटका बसतो, याचा विचार व्यवस्थापनाने केला काय? खरेदी दर २५ रुपये आणि विक्री प्रतिलिटर ४५ रुपये, व्यवस्थापन खर्च प्रतिलिटर २० रुपये होतो का? या प्रश्‍नांचा समावेश आहे. दूध दर कपातीबाबत तर आजही राज्यात गोकुळचा खरेदी दर सर्वाधिक आहे.

दूध खरेदीत दोन रुपये प्रतिलिटर कमी करण्याचा निर्णय गोकुळ आणि उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच घेतला. गोकुळच्या म्हशीच्या दुधाला अधिक मागणी आहे. मात्र, दिवसेंदिवस म्हशीच्या दुधाचे प्रमाण कमी होत आहे. त्याप्रमाणात गायीच्या दुधाला मागणी मात्र कमी आहे. गायीच्या दुधाची विक्री वाढविण्याचा प्रयत्न चालू आहे. सुगीच्या काळात २ लाख लिटरपर्यंत दुधाची भुकटी करण्यात येते. १ लिटर दूध भुकटी केल्यास संघाला साधारण: ९ रुपये ७१ पैसे तोटा सहन करावा लागतो.

दुसरीकडे हजारो टन दूध भुकटी विक्रीविना पडून राहील. या भुकटी व लोण्यात साधारणपणे २०० कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यावर एक वर्षाचे व्याज २० कोटी संघाला सहन करावे लागेल. म्हणजेच लोणी व दूध भुकटी केली म्हणून १९.४२ कोटींचा तोटा व दुसरीकडे २० कोटी व्याजाचा तोटा, असा साधारणपणे ४० कोटींचा तोटा होईल व त्याचा भुर्दंड गोकुळला पर्यायाने दूध उत्पादकाला बसेल. त्यामुळेच उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवून दूध कपातीचा निर्णय घेतला.’’

ते म्हणाले, ‘‘गोकुळ राज्यात नव्हे तर देशात गुणवत्तेचे दूध संकलन करणारी संस्था आहे. दूधवाढीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. जागोजागी बीएमसीचे मशीन बसविण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण गावांत हे मशीन बसविण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना जास्त दर मिळावा, हाच हेतू आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा सरासरी दर हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात अग्रणी राहणार आहे.

३.५ ते ८.५ गुण प्रतीच्या दुधाचा दर २५ रुपये, अधिक संघाचा वार्षिक दर फरक १ रुपये ६० पैसे, संस्था कमिशन १ रुपये २० पैसे असा २७ रुपये प्रतिलिटर सध्या दुधाचा दर पडतो. आजही गोकुळचा दर शासनाच्या नियमाप्रमाणे जास्त आहे. विक्री प्राप्तीसाठी संघास प्रतिलिटर १३.१९ रुपये संघाला खर्च येतो. वरकढ खर्च ४५ रुपये विक्री दरातून वजा जाता निव्वळ ३१ रुपये ८१ पैसे एवढा दर शिल्लक राहतो. संघाने चालू वर्षी २९.६६ रुपये दर दिला. तो वजा जाता २ रुपये १५ पैसे शिल्लक राहतात. या नफ्यातून चालू वर्षाकरिता १ रुपये ५ पैसे प्रोव्हिजनल दर फरक अधिक ४० पैसे वाढीव संस्था व्यवस्थापन खर्च, असे १.४५ रुपये उत्पादकांना देणे अपेक्षित आहे. त्यामुळे संघाला निव्वळ ७० पैसे राहतात. 

...तर जनावरे विकण्याची वेळ येईल
दुधाचा दर कमी केला नाही, तर शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करणे काही दिवसांसाठी बंद करावे लागेल. त्याचा फटका उत्पादकाला बसेल. जनावरे विकण्याची वेळ त्यांच्यावर येईल. त्यामुळे दूध उत्पादकांचेच नुकसान दोन रुपये दर कमी केल्याने होणाऱ्या नुकसानीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असेल, असे श्री. पाटील म्हणाले.

..तर न्यायालयात जावे लागेल..
शासनाने शेतकऱ्यांना दूध दर देण्याबाबत नोटीस काढली. ही नोटीस चुकीची आहे. शेजारच्या कर्नाटकात दूध संघ जर कमी दर शेतकऱ्यांना देत असेल तर वर लागणारी रक्‍कम सरकार घालते. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही करावे. दुधाचे दर सरकारने ठरविण्याची पद्धत कोठेही अस्तित्वात नाही. नोटीस संदर्भात सर्व सहकारी दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात दूध संघांनी वस्तुस्थिती सरकारच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेईल, अशी आशा आहे. जर सरकार आपल्या मतावर ठाम राहिले, तर मात्र आम्हाला न्यायालयात जावे लागेल.

‘गोकुळ’वरील आरोप बिनबुडाचे

‘गोकुळ’वर आमदार सतेज पाटील यांनी केलेले आरोप निराधार व बिनबुडाचे आहेत. गोकुळचा कारभार चांगला असून, यापूर्वी आमच्यावर आरोप करणाऱ्यांना त्याची माहिती दिली आहे. आमदार पाटील यांनी गोकुळच्या कारभाराची माहिती घेण्यासाठी कधीही यावे, ती देण्यास आम्ही तयार आहोत, असे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना 
सांगितले.

ते म्हणाले, ‘‘यापूर्वीही गोकुळच्या कारभारावर अनेकांनी टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही  दूध दर कमी करण्यावरून अरुण नरके अध्यक्ष असताना आरोप केले होते. यासंदर्भात वस्तुस्थिती सांगण्याची आम्ही तयारी दर्शविली. त्या वेळी मेजर प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने दहा-पंधरा दिवस संपूर्ण माहिती घेतली. त्यांना हवी ती माहिती आम्ही दिली. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अशी वस्तुस्थिती असतानाही गोकुळवर आरोप करणे सुरूच आहे. 

आरोपात काहीच तथ्य नसते, मात्र त्यामुळे संघाची बदनामी होते. अशाप्रकारे संघाची बदनामी कोणी करू नये. ज्यांना माहिती हवी असेल, त्यांनी संघात येऊन खुशाल ती मागावी. आम्ही देण्यास तयार आहोत. म्हशीच्या दुधात गायीचे दूध मिसळून त्याची विक्री करणे सोपे नाही.’’

या वेळी अरुण नरके, रणजितसिंह पाटील, रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, विश्‍वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, वसंत खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, अनुराधा पाटील, जयश्री पाटील-चुयेकर, बाबा देसाई, रामराजे कुपेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com