मुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल 

​शेखर जोशी
बुधवार, 31 मे 2017

भाजपचे गुणगाण तर केलेच, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. लाखो शेतकऱ्यांचा आशीर्वाद असल्यानेच मुख्यमंत्री हेलीकॉप्टर अपघातून सहीसलामत बचावले, असे सांगून स्तुतिपाठकाच्या यादीत जाऊन बसले.

काँग्रेस आघाडीची संघर्ष यात्रा संपली आणि राजू शेट्टींचे आत्मक्‍लेश आंदोलन सुरू झाले. शेट्टी मुंबईत आत्मक्‍लेश करीत असताना त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत इस्लामपुरात भाजपमय झाले होते. जीएसटीवरील चर्चेच्या निमित्ताने भाजपमधील बेदिलीचा पंचनामा करताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना बोचरे चिमटे काढले होते. जयंतरावांचा राज्यस्तरावरची ही विरोधी नेत्याची ही स्पेस चाणाक्ष मुख्यमंत्र्यांनी न जाणली तर नवल. शेट्टी आणि जयंतरावांनी सरकारपुढे उभ्या केलेल्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांनी सदाभाऊंची ढाल करीत इस्लामपुरात हम भी कुछ कम नही, असा इशारा दिला आहे. एका दगडात दोन पक्षी घायाळ झाले आहेत. ज्याचे परिणाम येत्या काही दिवसांत नक्की दिसतील. 

सदाभाऊंसह त्यांचा स्वाभिमानी गट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी स्वत:च खासगीत दिले होते. पण सदाभाऊंचे अगदी हवामान खाते झाले. ऐनवेळी जमिनीला घात आली नसल्याचे सांगत त्यांनी भाजप प्रवेशाची पेरणी लांबणीवर टाकून शेट्टींना गोत्यात टाकले. एकूणच इस्लामपुरात इशारे पे इशारे मेळावा झाला. "तुम्ही मला खलनायक बनवू नका' असाही आणखी एक इशारा सदाभाऊंनी शेट्टींना दिला.

भाजपचे गुणगाण तर केलेच, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. लाखो शेतकऱ्यांचा आशीर्वाद असल्यानेच मुख्यमंत्री हेलीकॉप्टर अपघातून सहीसलामत बचावले, असे सांगून स्तुतिपाठकाच्या यादीत जाऊन बसले. इस्लामपूरचा मेळावा शत-प्रतिशत भाजपचा होता. त्याचे नामकरण मात्र शेतकरी मेळावा असे करण्यात आले होते. या मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन राजकीय पक्षी घायाळ केले. राष्ट्रवादीचे विधिमंडळातील नेते जयंत पाटील यांचा हा आमदारकीचा, तर शेट्टी यांचा खासदारकीचा मतदारसंघ आहे. मुख्यमंत्री नुसता गाळच काढत बसलेत, अशी जयंतरावांच्या टीका पाटील नेहमी करतात. या टीकेला त्यांच्या गावात येऊन मुख्यमंत्र्यांनी तुमचा 15 वर्षांचा गाळ आम्ही उपसत आहोत, असे मार्मिक उत्तरही दिले.

तसेच कृष्णा खोऱ्यात राष्ट्रवादीने किती गाळा मारला, असा टोमणाही लगावला. शेट्टींचा थेट उल्लेख न करता ते म्हणाले,"सरकारचे काम चांगले चालले असल्याने आंदोलकांची दुकाने बंद पडत आहेत. त्यामुळेच अनेकांची कोल्हेकुई सुरू असल्याचा चिमटाही त्यांनी घेतला. खरे तर भाजपचे कसेबसे एक-दोन नगरसेवक इस्लामपुरात निवडून यायचे तिथे आता पूर्ण सत्ता भाजप आणि मित्र पक्षांची आली आहे. जयंतरावांच्या गावात पूर्वी भाजपचा म्हणजे अण्णा डांगेंचा नगराध्यक्ष भाजपचा झाला होता. आता राष्ट्रवादीतून फुटलेला कधीकाळचा चेला आता भाजपमधून जयंतरावांना आव्हान देत आहे. गेली कित्येक वर्षे कॉंग्रेसमधील विरोधकांनाही जयंत पाटलांच्या गडाला साधी चिरही पाडता आली नव्हती तेथे भाजपने कॉंग्रेससह मित्रपक्षांची मदत घेत जयंतरावांना जोर का झटका दिला. जयंतरावांच्या या गडात आष्टा एक मोठे संस्थान आहे. तेथे तहहयात माजी आमदार विलासराव शिंदे यांची एक हाती सत्ता आहे. त्यांनी एक काळ राजारामबापू पाटील यांचा पराभव करून मोठा हादरा दिला होता. मात्र त्यानंतर गेली कित्येक वर्षे ते जयंतरावासोबत आहेत. सध्या जिल्हा परिषदेला झालेल्या मुलाच्या पराभवाने मात्र ते जयंतरावांवर नाराज आहेत, अशी चर्चा असतानाच आता त्यांचा मुलगा वैभव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जयंतरावांना पुन्हा एक हादरा बसला आहे. 

जयंतरावांनीच सांगली जिल्ह्यात भाजपला हातपाय पसरायला जागा करून दिली, अशी कॉंग्रेसकडून त्यांच्यावर टीका होत असते. ते खरेच. कारण येथे राष्ट्रवादी वाढविण्यासाठी जयंतरावांनी भाजपकडून कॉंग्रेसचे पत्ते कापायला जतपासून प्रयोग सुरू केले. सांगली-मिरजेतही अशा प्रयोगात कॉंग्रेसचे पत्ते कापले गेले; आणि आज भाजप येथे जयंतरावांना डोईजड होऊन बसली आहे. हा प्रयोग आता इस्लामपुरात त्यांच्यावरच उलटला असून नगरपालिका गेली आहे, आता त्यांच्या विरोधकांचे विधानसभा हे लक्ष्य असेल. आधीच शेट्टी आणि आमदार शिवाजीराव नाईक यांनी हा मतदारसंघ खणायला सुरवात केली होती. त्यात आता सदाभाऊ मंत्री झाल्याने जयंतरावांचे ते वलय आकसले आहे. मुख्यमंत्री इस्लामपूरला विशेष निधी देताहेत, कृषी महाविद्यालय दिले आहे. एकूणच विधानसभेत जयंत पाटील सरकार विरोधात अधिक आक्रमक होणार नाहीत यासाठी त्यांना त्यांच्या मतदारसंघातच गुंतविण्याची खेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे, असे या दौऱ्यामागचे एक कारण. 

दुसरे कारण म्हणजे राजू शेट्टींच्या आंदलनातील हवा काढून घेण्याचीही ही चाल होती. स्वाभिमानी फुटीच्या उंबरठ्यावर आज दिसते आहे. आधीच अनेक तुकड्यात विभाजित झालेली शेतकरी संघटना आता पहिल्या इतकी आक्रमक राहिलेली नाही. त्यातच राजू शेट्टींची शेतकरी आंदोलनाची स्पेस आकसते आहे. जिल्हा परिषदेला त्यांच्या मतदारसंघातही त्यांना फारसा प्रभाव टिकवता आलेला नाही. ते त्यांच्या होमपिचवर शिरोळ तालुक्‍यातील चित्र आहे. त्यात सदाभाऊ सरकारमध्ये जाऊन बसल्याने शेट्टी फक्त नेते उरले आहेत. त्यांचे आत्मक्‍लेश आंदोलन भाजपविरोधातले आहे. सदाभाऊ त्यात सामील झाले नाहीत...त्यामुळे त्यांना ऊन सोसत नाही, असा टोला शेट्टींनी मुंबईत लावला. सत्तेच्या सावलीत गेल्यानंतर पुन्हा ऊनात यावे अशी अपेक्षा बाळगणे तसे गैरच.

भाजप आणि स्वाभिमानीचाच एकत्र मेळावा घेऊन शक्‍तिप्रदर्शन घडवत शेट्टींच्या अडचणी वाढविल्या आहेत. कारण या मेळाव्यात स्वाभिमानीचे झेंडे, संघटनेचे लाल बिल्ले आणि सदाभाऊ असे लिहिलेल्या वेगळ्या टोप्या होत्या, ज्या संघटनेची नवी चूलच आधोरेखीत करत होत्या. सदाभाऊंनी भाजपशी नव्या नात्याची आणि समांतर संघटनेचीही नांदी केली आहे. एकूणच इस्लामपूर दौरा हा जयंत पाटलांचा किल्ला  भेदण्यासाठी आणि शेट्टींना इशारा देण्यासाठीचा प्रयोग होता. तो किती यशस्वी होतोय ते येणाऱ्या भविष्यात समजेल.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी
दीड पायाच्या ‘लक्ष्मी’ची झेप
#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान
शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेरावे