मला 'पाया'वर उभारायचंय! 

श्रीनिवास दुध्याल
रविवार, 6 ऑगस्ट 2017

मी कधी घराबाहेर पडले नाही. मला लोकांची भीती वाटत असे. दिव्यांग असल्यामुळे आत्मविश्‍वासही नव्हता की काही करावं. मात्र प्रतिभा हजारे यांनी माझ्यात जिद्द निर्माण करून शिवणकाम शिकवले. आता मी विडी वळण्याचे काम सोडून शिवणकामात भवितव्य निर्माण करू इच्छिते. आता मी समाजात वावरणार आहे. न्यूनगंड दूर सारणार आहे. आत्मविश्‍वासाने जगणार आहे. 
- अंबूबाई

सोलापूर : सर्व अवयव शाबूत असतानाही थोडे अपयश आले तर खचून जाणारे अनेक दिसतात. मात्र, यशाच्या शिखरापर्यंत पोचूही न शकणारे काहीजण चढ-उतारांवर खचून न जाता संघर्ष करत यश मिळवतात. अशी काही उदाहरणे आहेत, त्यापैकीच गोदूताई वसाहतीत राहणाऱ्या 31 वर्षांच्या अंबूबाई मामिंढना या आहेत. दीड वर्षांच्या असताना त्यांचा पोलिओमुळे डावा पाय पूर्णत: व उजवा पाय अंशत: निकामी झाला. समज आलेल्या वयात मनात न्यूनगंड ठेवून घराबाहेर न पडणाऱ्या व जगाशीच अबोला धरलेल्या अंबूबाई यांना आता स्वत:च्या 'पाया'वर उभारायचं आहे. 

अंबूबाई यांची घरची आर्थिक स्थिती बेताचीच. पाय अधू असल्यामुळे मित्र-मैत्रिणींकडून त्यांची हेटाळणी व्हायची; मात्र लहान वयात त्यांना हे अंगवळणी पडले होते. लहान भाऊ व बहिणीसोबत शाळेला जाऊन सातवीपर्यंत त्या कसेबसे शिकल्या. समज आल्यावर मात्र ही हेटाळणी सहन न झाल्याने शिक्षणाची इच्छा असूनही त्यांनी ते बंद केले. आईने देसाई विडी कारखान्यात त्यांचे कार्ड बनवल्याने विडी वळणे व घरातच राहणे असा त्यांचा दिनक्रम! कोणाशी बोलणे नाही, बाहेर जाणे नाही... सात वर्षांपूर्वी लहान भाऊ व वडिलांचेही निधन झाले... बहिणीचे लग्न झाले... आईने वयोमानानुसार कामाचा राजीनामा दिला. आईची पेन्शन व दिव्यांगत्वाचे त्यांना शासकीय अनुदान मिळते.

अंबूबाई व त्यांच्या आई एकमेकांचा आधार बनल्या. एके दिवशी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या बालमणी दोमा यांनी श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघातर्फे महिलांसाठी मोफत शिवणकला प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती दिली. विड्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा पुढील भवितव्याचा विचार करून शिवणकला प्रशिक्षण घेण्याचा त्यांना सल्ला दिला. मग अंबूबाई याहीही धीर एकवटून हाती कुबड्या घेऊन बाहेर पडल्या... 

संघाच्या शिवणकला प्रशिक्षिका प्रतिभा हजारे यांनी त्यांना धीर दिला. त्यांच्यातील न्यूनगंड दूर करून आत्मविश्‍वास निर्माण केला. 1 जुलैपासून त्या नियमित प्रशिक्षणाला येत राहिल्या. एका पायाने शिलाई यंत्राचा पायटा दाबत टाके घालायला सुरवात केली अन्‌ एका महिन्यात त्या विविध प्राथमिक पॅटर्नमध्ये सफाईदार काम शिकल्या. आता अंबूबाई यांची निवड एमआयडीसी येथील ऍडव्हान्स ऍपरल्स या कारखान्यात झाली आहे. त्यांना दरमहा पगार मिळणार आहे. यामुळे अंबूबाई यांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला आहे. त्या म्हणतात, 'मला स्वत:च्या 'पाया'वर उभारायचे आहे.' मात्र, गरज आहे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांनी त्यांना हात देण्याची, त्यांच्या हातातील कुबड्या दूर सारण्याची. 

जेव्हा अंबूबाई आमच्याकडे आल्या, तेव्हा त्या मशिन ऑपरेट करू शकतात का, याची चाचणी घेतली. त्यांचा उजवा पाय जास्त भार पेलू शकत नव्हता; मात्र त्या मशिन ऑपरेट करायला शिकल्या. पण त्यांच्या मनात आत्मविश्‍वास निर्माण करणेही गरजेचे होते. त्यांना एवढंच सांगितले, तू मनात ठरव की मी हे करू शकते आणि करणारच. त्यानुसार जिद्दीने शिवणकाम शिकल्या व आता रोजगार मिळवणार आहेत. 
- प्रतिभा हजारे, प्रशिक्षिका, श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ