'पानिपत'वीर सदाशिवरावभाऊंच्या समाधीचे अस्तित्व मठ रूपात

'पानिपत'वीर सदाशिवरावभाऊंच्या समाधीचे अस्तित्व मठ रूपात

सांगली : 'पानिपत'वीरांच्या समाधींचा जीर्णोद्धार, तसेच त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. या लढाईत मारल्या गेलेल्या सदाशिवरावभाऊंची समाधी आज नाथपंथीय मठाच्या स्वरूपात आहे. पानिपत युद्धाचे स्मारक असलेल्या काला आम स्मारकस्थळी महाराष्ट्र सरकारच्या वतीने दरवर्षी पुष्पचक्र वाहिले जावे,'' अशी मागणी इतिहासाचे अभ्यासक प्रवीण भोसले यांनी केली. उद्या (ता. 14) पानिपत युद्धाचा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने श्री. भोसले यांनी उत्तर भारतातील भटकंतीदरम्यान 'पानिपत'वीरांच्या घेतलेल्या समाधीच्या शोध मोहिमेची माहिती दिली.

ते म्हणाले, ''सिंघी या रोहटक जिल्ह्यातील ठिकाणी भाऊंची समाधी आहे. सध्या नाथपंथीय मठाचे स्वरूप असलेल्या या समाधीच्या अंतर्भागात भाऊंची समाधी व शेजारी त्यांची मूर्ती स्थापन केली आहे. मठावर लिखाण करणारे स्थानिक शिक्षणाधिकारी हुडा व मठातील पूर्वापार ठेवलेल्या नोंदीनुसार हा मठ प्रत्यक्ष भाऊंनी स्थापन केला आहे. स्थानिकांचा असा विश्‍वास आहे व मठातील समाधी सदाशिवभाऊंची आहे असे ते मानतात. पानिपतावर भाऊ मारले गेले की कालांतराने, हे निश्‍चित नसले; तरी ही समाधी भाऊंची आहे, हे मठातील नोंदीनुसार स्पष्ट आहे.''

ते म्हणाले, ''मराठेशाहीच्या इतिहासात पानिपतच्या लढाईला खूप महत्त्व आहे. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. त्यामुळे कोणत्याही मोठ्या पराभवाचे वर्णन 'पानिपत' असे केले जाते. खरे तर पानिपतच्या लढाईचे भारतीय इतिहासाने खऱ्या अर्थाने मूल्यमापन केले नाही. हा पराभवाचा इतिहास नव्हे, तर या देशावर चालून आलेल्या शत्रूचा एत्‌द्देशीयांनी केलेला प्रतिकार आहे. त्यामुळे ही दोन शाह्यांमधील नव्हे; तर दोन राष्ट्रांमधील लढाई होती. या लढाईला उद्या (ता. 14) 257 वर्षे पूर्ण होत आहेत. 14 जानेवारी 1761 रोजी लढाईला सुरवात झाली आणि एकाच दिवशी पुरता पराभव झाला. या इतिहासाचे स्मरण आपण करून इतिहासातून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. तत्कालीन भारतातील सर्वांत मोठे युद्ध व भीषण नरसंहार घडला, तो पानिपतच्या तिसऱ्या लढाईत. मराठे विरुद्ध अहमदशहा अब्दालीची अफगाण फौज यांच्यात झालेल्या तीव्र लढाईचा हा स्मृतिदिन. पानिपतावर मारल्या गेलेल्या मराठ्यांमध्ये सर्वच जातीधर्मांचे मराठे म्हणजे महाराष्ट्रीय होते. अठरापगड जातीजमातींच्या सैनिकांनी एकत्र येत हा लढा दिला. या सर्व जातींचे लोक या युद्धात ठार झाले. एका अर्थाने प्रातिनिधिक रूपाने महाराष्ट्रच पानिपतावर लढला. जवळपास 1,50,000 मराठे या दिवशी लढून धारातीर्थी पडले, ते हिंदुस्थानच्या रक्षणासाठीच. परकीय, अत्याचारी, लुटारूंपासून हा देश वाचविला पाहिजे, या राष्ट्रीय भावनेने मराठे इथे मातीत मिसळले. जवळपास घरटी एक लढवय्या मराठा पानिपतावर ठार झाला.'' 

ते म्हणाले, ''या लढाईत सेनापती सदाशिवरावभाऊ, नानासाहेब पेशव्यांचे पुत्र विश्‍वासराव ह्यांच्यासह अटकेपार भगवा फडकविणारे मानाजी पायगुडे, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे, बळवंतराव मेहंदळे, यशवंतराव पवार, खंडेराव निंबाळकर, संताजी वाघ, सखोजी जाधव, सिधोजी घाटगे, राणोजी भोई, सोनजी भापकर, इब्राहिमखान गारदी असे मराठा साम्राज्याचे प्रमुख मोहरे मारले गेले. बाजीराव-मस्तानीचे पुत्र समशेर बहादूर या युद्धातील जखमांनी भरतपूरला मारले गेले. या सर्वांच्या बलिदानाने हिंदुस्थान बचावला. देशासाठी मृत्यू पत्करण्याची तयारी तत्कालीन भारतात मराठ्यांनी सर्वप्रथम दाखविली. याची सुरवात झाली, दत्ताजी शिंदेंना दिल्लीजवळच्या बुराडी गावातील घाटावर कुतूबशहाने ज्या रीतीने मारले, त्या घटनेने. या युद्धात मरणासन्न अवस्थेतील दत्ताजींना कुतूबशहाने लाथेने डिवचून विचारले, ''क्‍यूं पटेल? और लडोगे?'' त्याही अवस्थेत दत्ताजी म्हणाले, ''क्‍यूं नही? बचेंगे तो और भी लढेंगे.'' दत्ताजींचे हे उद्‌गार भारताच्या इतिहासात अजरामर झाले आहेत. बुराडी घाटावर मारल्या गेलेल्या दत्ताजी शिंदेंची समाधी शोधण्यासाठी मी शिवपुरी, उज्जैन, ग्वाल्हेर या ठिकाणांना भेटी दिल्या. प्रत्यक्ष शिंदे घराण्यातील जाणकारांशी बोलल्यानंतर माझी खात्री झाली, की दत्ताजीरावांची समाधी अस्तित्वात नाही. यामुळे बुराडी घाट हेच त्यांचे स्मारक ठरायला हवे. त्यांचा अंत्यसंस्कार बुराडी घाटावरच झाला होता.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com