श्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक

संजय आ. काटे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

याशिवाय २२२ पैकी आठ अंगणवाड्या धोकादायक असून शंभर अंगणवाड्यांची दुरुस्तीची गरज आहे.  येथेही निम्यापेक्षा कमी अंगणवाड्या इमारती सुस्थितीत आहेत. काष्टी, कोळगाव व पिंपळगापिसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती पाडून तेथे नव्या बांधण्याचा प्रस्ताव आहे.  

श्रीगोंदे,(जिल्हा नगर) : निंबोडी येथील प्रकरणाने जागे झालेल्या पंचायत समितीच्या पथकाने केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले. तपासणी झालेल्या ५८९ शाळा खोल्यांपैकी १४९ खोल्या धोकादायक असून सुमारे सव्वादोनशे खोल्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. तालुक्यात अंगणवाडी व आरोग्य केंद्राच्या अनेक इमारतींचीही वाईट अवस्था असल्याने त्याठिकाणी मोठी दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. 

निंबोडी येथील प्राथमिक शाळा कोसळून त्यात चिमुकल्यांचा जीव गेल्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झाले. श्रीगोंद्यात शाळांसह शासकीय इमारती तपासण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता डी.डी. कांगुणे यांच्या नेतृत्वाखाली गटनिहाय पथक तयार केले होते. त्यांनी तपासणीचा अहवाल अजून अंतीम झाला नसला तरी समजलेल्या माहितीनूसार अनेक धक्कादायक इमारतीत मुले शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. कदाचित निंबोडी प्रकरण घडले नसते तर श्रीगोंद्यातील यातील एखादी शाळा कोसळून यापेक्षा भयानक घटना घडली असती असे पथकातील काहींनी सकाळशी खाजगीत बोलताना सांगितले. 

या पथकाने ५८९ शाळा खोल्यांची तपासणी केली. त्यातील १४९ खोल्या निर्लेखन प्रस्तावात देणार आहेत. म्हणजे या खोल्या धोकादायक बनल्याने तेथे शाळाच भरली जावू नये असे अभिप्राय देताना यातील अनेक ठिकाणचे विद्यार्थी पथकानेच बाहेर काढले. याव्यतिरिक्त सुमारे सव्वादोनशे शाळा खोल्यांची दुरुस्तीची गरज मांडण्यात आली. विशेष म्हणजे त्यात आर्थिकदृष्ट्या सर्वात सधन असणाऱ्या काष्टी जिल्हा परिषद गटातील १०२ पैकी बावीस खोल्या धोकादायक असून पन्नास खोल्यांची दुरुस्तीची गरज आहे. तेथे केवळ तीस खोल्या सुस्थितीत असल्याचे पथकाचे मत आहे.

तालुक्यात तपासणी केलेल्या ५८९ पैकी २६३ खोल्याच सुस्थितीत असल्याचे पथकाचे मत आहे. पन्नास वर्षापुर्वी बांधलेल्या सगळ्याच खोल्या पाडणे जाणे आवश्यक असून मध्यंतरी ज्या षटकोनी पध्दतीच्या शाळा खोल्या बांधल्या त्यातीलबहुतेक खोल्यांना गळती आहे. श्रीगोंदे शहरातील ४१ पैकी केवळ दहा खोल्या सुस्थितीत असून सात खोल्या धोकादायक आहेत. शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी तीन कोटींवर निधी लागणार आहे. 

याशिवाय २२२ पैकी आठ अंगणवाड्या धोकादायक असून शंभर अंगणवाड्यांची दुरुस्तीची गरज आहे.  येथेही निम्यापेक्षा कमी अंगणवाड्या इमारती सुस्थितीत आहेत. काष्टी, कोळगाव व पिंपळगापिसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती पाडून तेथे नव्या बांधण्याचा प्रस्ताव आहे.  

मुंढेकरवाडी येथील शाळा जून्या जलकुंभाखालील इमारतीत भरविली जाते. मात्र हा जलकुंभ शाळेच्या बाजूला झुकल्याने त्यात पाणी सोडणे बंद केले होते. काही दिवसांपुर्वी अडचणीमुळे त्यात पाणी सोडले होते. तो जलकुंभ कधीही शाळेच्या इमारतीवर कोसळल्याची शक्यता वाढल्याने उपअभियंता कांगुणे यांनी त्याबाबत संबधीतांना कडक भाषेत सुनावताना 'जलकुंभ पाडा अथवा मुले दुसरीकडे बसवा 'असा सक्त आदेश केला. सध्या तो जलकुंभ पाडण्याचे काम सुरु असल्याने प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे.

Web Title: Nagar news school building dangerous