भाजपच्या जाहिरातीतील मावशीला शोधत आहे: सुप्रिया सुळे

Supriya Sule
Supriya Sule

पंढरपूर : भाजपा सरकार गेल्या तीन वर्षात संपूर्ण अपयशी ठरले आहे. हमीभाव नाही. महागाई वाढली आहे. या सरकारमधील लोक केवळ उत्तम भाषणे करतात, मार्केटींग करतात परंतु सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवण्याविषयी कोणतीही कृती करत नाहीत. निवडणूकीपूर्वी पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीच्या विरोधात बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीमधल्या मावशीला मी शोधत आहे अशी मिष्कील प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

"जागर जनसंवाद यात्रेचा" या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयातील युवक -युवतींशी संवाद साधण्यासाठी सौ.सुळे यांचे आज रात्री येथे आगमन झाले. उद्या (ता.19) रोजी सकाळी त्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मार्गदर्शन करणार आहेत. 

येथील शासकीय विश्रामगृहात रात्री नऊ वाजता पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. तेंव्हा त्यांनी राज्य शासनाच्या कारभारा विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

सुळे म्हणाल्या, शिवसेनेने यापूर्वी ही बऱ्याचवेळा सरकारमधून काडीमोड घेण्याची धमकी दिली होती. ते बोलतात, रुसतात परंतु बोलल्याप्रमाणे ऍक्‍शन काहीच करत नाहीत त्यामुळे त्यांचा इशारा म्हणजे आता जोक समजला जाऊ लागला आहे असे त्यांनी नमूद केले. पारदर्शकते बाबत सातत्याने बोलले जाते परंतु या सरकार मधील अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु झाली आहे. महागाई वाढली आहे. हमी भाव नाही. त्यामुळे शेकतरी आणि सर्वसामान्य जनता हैराण झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

पाशा पटेल यांनी पत्रकारास उद्देशून वापरलेल्या असंसदीय भाषेच्या संदर्भात विचारेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, त्यांचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. पारदर्शी सरकार चालवणारे मुख्यमंत्री या संदर्भात आता सर्व प्रेसच्या लोकांना न्याय मिळवून देतील अशी मला अपेक्षा आहे. 

सुळे म्हणाल्या, आज कर्जतमध्ये एक मुलगा माझ्याकडे न्याय मागण्यासाठी आला होता. तो म्हणाला ताई आमची बॅंकेत दोन खाती आहेत. कर्ज माफीच्या सर्व निकषात आम्ही बसतो म्हणून चारशे रुपये खर्च करुन कागदपत्रांची पुर्तता केली परंतु मला एका बॅंक खात्यावर सत्तर तर दुसऱ्या खात्यावर केवळ साठ असे एकूण एकशे तीस रुपये जमा झाले आहेत. अशा प्रकारची कर्ज माफी जर होत असेल तर ही अतिशय चिंताजनक व गंभीर बाब आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे अशा प्रकारांकडे लक्ष वेधणार असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत मी या शासनाला शांत बसू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 

यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिपक साळुंखे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com