संशयित आरोपीला ठार करून मृतदेह जाळला : सांगली पोलिसांची अमानुषता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी तातडीने पत्रकार परिषद घेवून या प्रकरणातील पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती दिली आहे.

सांगली : अनिकेत अशोक कोथळे या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी जे कृत्य केले ते माणुसकीला काळीमा फासणारे आहे. सरुवातीला दोन आरोपी पोलिस कोठडीतून पळाले असा बनाव या प्रकरणात सांगली शहर पोलिसांनी केला. मात्र आज पोलिसांनीच दिलेल्या माहितीनुसार अनिकेतचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह अंबोली येथे नेवून जाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उमटली असून कोल्हापूर पोलिसक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी तातडीने पत्रकार परिषद घेवून या प्रकरणातील पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान या घटनेत पोलिसांनी एका तरुणाचा मृत्यू लपविण्यासाठी जे हिडीस कृत्य केले आहे. त्याबाबत संतापाची लाट उसळली आहे. मुळातच सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी कळसला चढली असताना त्यात पोलिसांच्या अमानुष कृत्याने जिल्हा हादरून गेला आहे. एका किरकोळ वाटमारीचा संशय असलेल्या प्रकरणात या दोन आरोपींना पोलिसांनी पकडले होते. 

याबाबत अधिक माहिती अशी - संतोष गायकवाड यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून दोन हजारांची रोकड आणि मोबाईल पळवून नेण्याचा प्रकार कोल्हापूर रोडवर रविवारी घडला होता. यातील संशयित अनिकेत कोथळे आणि अमोल सुनील भंडारे (दोघेही रा. भारतनगर, कोल्हापूर रोड, सांगली) यांना शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. दोघांनाही काल (सोमवारी) रात्री अकराच्या सुमारास चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढले होते.

या प्रकरणाचे तपास अधिकारी उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या पथकाने त्यांना बाहेर काढले. त्यावेळी दोघे पोलिसांना हिसडा देऊन पळून गेले, अशी नोंद स्टेशन डायरीत करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच गायब केले. अर्थात पोलिसांनी संशयित आरोपी अनिकेतच्या घरी फोन करून हे प्रकरण परस्पर मिटविण्याचा प्रयत्नही केला. त्यातून त्याच्या कुटुंबियांना संशय आला आणि यातूनच पोलिसांनी केलेला सारा बनाव उघडकीस आला आहे. अर्थात यासाठी विविध संघटना भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी शहर पोलिसांवर खरे सत्य बाहेर येण्यासाठी दबाव निर्माण केला होता. यातील दुसरा आरोपी भंडारेकडील माहितीमुळेही या प्रकरणावर प्रकाश पडला. अन्यथा पोलिसांनी पलायन आणि मृत्यू अशी फाईल बनवली असती. यातील पोलिसांना निलंबित केले असले तरी बडतर्फ करा अशी मागणी होत आहे.