#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रीच्या श्रम-संस्कारांद्वारे  वृत्तपत्र विक्रीच्या श्रम-संस्कारांद्वारे   

#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रीच्या श्रम-संस्कारांद्वारे  वृत्तपत्र विक्रीच्या श्रम-संस्कारांद्वारे   

सातारा -  वृत्तपत्र विक्रीच्या माध्यमातून झालेले श्रम व सातत्याचे संस्कार, त्याद्वारे मिळालेली ज्ञानाची शिदोरी आणि स्फूर्तीच्या जोरावर अनेकांनी आयुष्यात मोठी झेप घेतली. त्यामध्ये जिल्ह्यातील दोन वृत्तपत्र विक्रेत्यांचे नावही घेण्यासारखेच असून, त्यांची ही वाटचाल आजच्या बदलत्या काळातही अनेकांसाठी प्रेरणादायीच आहे. 

जावळी तालुक्‍यातील कुडाळचे वैभव वारागडे सध्या वाईतील एका कंपनीत सहायक व्यवस्थापक असूनही वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. तर, पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेताना औंध येथे वृत्तपत्र विक्री करणारे विक्रांत मोहन शिंदे सध्या एका खासगी फायनान्स कंपनीत प्रोजेक्‍ट इन्चार्ज म्हणून काम पाहताना देशभरातील महत्त्वाच्या नऊ शहरांमधील कामकाजाचे व्यवस्थापन करीत आहेत. 

वैभव वारागडे यांना तीन भाऊ. एक शिक्षक तर इतर दोन कमावते नव्हते. कुटुंब मोठे होते. त्यातच ते दहावीत असताना वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. एकट्या भावाच्या उत्पन्नावर कुटुंबाचा चरितार्थ चालवणे अवघड. त्या वेळी त्यांना वृत्तपत्र विक्री व्यवसायाची साथ मिळाली. बारावी झाल्यानंतर त्यांनी साताऱ्यातील महाविद्यालयात केमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. या काळातही दररोज सकाळी वृत्तपत्र विक्री करूनच ते महाविद्यालयात यायचे. त्यानंतर त्यांनी वारणानगर येथील महाविद्यालयात बी. ई.चे शिक्षण पूर्ण केले. या काळात त्यांच्या भावाने वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सांभाळला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वाई येथील एका कंपनीमध्ये प्रॉडक्‍शन सुपरवायझर म्हणून काम सुरू केले. सध्या ते त्याच कंपनीत सहायक व्यवस्थापक या पदापर्यंत पोचले आहेत. तरीही ते दररोज वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. कुटुंबाला मदतीची गरज असताना या व्यवसायाची साथ मिळाली तसेच उच्चशिक्षित होण्याची प्रेरणाही त्यातूनच मिळाल्याचे ते सांगतात.

औंध येथील मोहन शिंदे हे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत होते. पाचवीत गेल्यानंतर विक्रम यांनीही वडिलांना या व्यवसायात मदत पुरवली. पाचवी ते दहावी या कालावधीत ते अर्ध्या गावात वृत्तपत्र टाकायचे. त्यानंतर अभ्यास व शाळा असा त्यांचा दिनक्रम असायचा. त्यानंतर त्यांनी फलटण येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. वृत्तपत्र व्यवसायाचा मला त्या वेळी खूप फायदा झाल्याचे ते सांगतात. सध्या एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये प्रोजेक्‍ट इन्चार्ज म्हणून कार्य करताना दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, बंगळूर तसेच नागपूर, मुंबई व पुणे अशा नऊ शाखांची जबाबदारीही यशस्वीपणे पेलली जात आहे.

आमच्या शिक्षणाच्या काळात गावामध्ये पायी फिरून चाळीस अंक दररोज वाटले जायचे. अंक वाटून वाईला महाविद्यालयात जायला लागायचे. ऊन, वारा, पाऊस, थंडीचीही तमा न बाळगता सातत्यपूर्ण कार्यरत राहण्याची ऊर्जा या व्यवसायातूनच मिळाली.
- वैभव वारागडे,  कुडाळ 

वृत्तपत्र विक्री करत असताना लागलेले वृत्तपत्र वाचनाचे वेड एमबीएच्या एन्ट्रन्सवेळी कामी आले.  लहानपणापासून संपूर्ण वृत्तपत्र वाचून काढायची सवय होती. रविवारच्या सर्व पुरवण्याही वाचायचो. त्यामुळे एन्ट्रन्समध्ये सहज यश मिळाले. या शिक्षणाच्या जोरावरच बॅंकिंग क्षेत्रात चांगले काम करू शकलो.
- विक्रम शिंदे,  औंध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com