उदयनराजेंच्या एन्ट्रीने टोलनाका "फ्री'!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

सायगाव - पुणे- बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्‍यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सहा वाजण्याच्या सुमारास अचानक एन्ट्री घेत व्यस्थापनाला सर्व वाहने "टोल फ्री' करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सुमारे दोन तास कोणताही टोल न घेता सर्व वाहने सोडून देण्यात आली.

सायगाव - पुणे- बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्‍यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सहा वाजण्याच्या सुमारास अचानक एन्ट्री घेत व्यस्थापनाला सर्व वाहने "टोल फ्री' करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सुमारे दोन तास कोणताही टोल न घेता सर्व वाहने सोडून देण्यात आली.

या टोलनाक्‍यावरील व्यवस्थापन बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून वादंग सुरू आहे. टोलनाक्‍यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी करू नये, यासाठी खासदार उदयनराजेंनी पुढाकार घेतला होता. या टोलनाक्‍यावरील व्यवस्थापन आजपासून बदलले जाणार असल्याने मोठी चर्चा होती. काल (ता. 4) साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्यासोबत रिलायन्स कंपनीचे अधिकारी व नवीन टोलनाका व्यवस्थापन कंपनीच्या अधिकाऱ्यांच्यात बैठक झाली. त्यात चर्चेसाठी उदयनराजेंना बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे उदयनराजेंनी आपल्या समर्थकांसह सायंकाळी सहा वाजता टोलनाक्‍यावर अचानक एन्ट्री केली. टोलनाक्‍यावर आल्यानंतर उदयनराजे हे समर्थकांसह टोलनाक्‍यावर व्यवस्थापन कंपनीच्या कार्यालयामध्ये गेले. तेथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगून तेथील असणारे सीसीटीव्ही कॅमरे बंद करण्यात आले. बाहेर असणाऱ्या गार्डनवर येऊन त्यांनी ठिय्या मांडला. त्यानंतर टोलनाक्‍यावरून वाहने तशीच सोडून देण्यात आली. सर्व लेन मोकळ्या केल्याने कोणत्याही वाहनधारकांकडून टोल घेण्यात आला नाही.

याच दरम्यान उदयनराजेंनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्‌माकर घनवट यांनाही आपल्या स्टाइलमध्ये सुनावले.
"मला मारायच तर मारा; पण मानहानी सहन करणार नाही. किती नुकसान व्हायचे ते होऊ दे. मी त्याला भीत नाही. माझ्या लोकांच्यावर मी अन्याय होऊ देणार नाही. अजूनही मी संयम ठेवून आहे,' असे उदयनराजेंनी ठणकावले.

सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत उदयनराजे हे आक्रमकपणे आनेवाडी टोलनाका परिसरात शेकडो समर्थकांसह फिरत होते. त्यामुळे तेथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. भुईंज पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी बाळासाहेब भरणे हेही हजर होते, तरीही उदयनराजेंनी सुमारे दोन तास थांबून टोलनाका "फ्री' केला. आठ वाजण्याच्या सुमारास उदयनराजे हे टोलनाक्‍यावरून निघून गेल्यानंतरही त्यांचे समर्थक नाक्‍यावरच थांबून टोलनाक्‍यावर लक्ष ठेवून होते. या वेळी अशोक सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, सुनील काटकर, नितीन शिंदे, रोहित सावंत उपस्थित होते

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांना पब्लिसिटी करण्याच्या हव्यास असून, सतत ते मीडियावर झळकत असतात. ज्यांच्यावर खरंच अन्याय होत आहे, त्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे.
- खासदार उदयनराजे भोसले