सोलापूर: दूध, भाजीपाला रस्त्यावर ओतणे सुरूच 

संतोष सिरसट
शुक्रवार, 2 जून 2017

सोशल मिडियावर दुधाची व भाजीपाल्याची नासाडी करू नका असा संदेश व्हायरल झाला आहे. त्यावर शेतकऱ्यांनी आक्रमक होत आमचेच नुकसान होणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संपाचा दुसरा दिवस पहिल्या दिवसाप्रमाणेच सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर दूध व भाजीपाला ओतून सरकारचा निषेध केला आहे. 

सोशल मिडियावर दुधाची व भाजीपाल्याची नासाडी करू नका असा संदेश व्हायरल झाला आहे. त्यावर शेतकऱ्यांनी आक्रमक होत आमचेच नुकसान होणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. 

राज्यभर कालपासून शेतकऱ्यांचा संप सुरू झाला आहे. त्याचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटत आहेत. पहिल्या दिवशी जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध वेगवेगळ्या पद्धतीने केला आहे. तीच स्थिती संपाच्या दुसऱ्या दिवशीही कायम आहे. जिल्ह्यातील अनेक बाजार समित्या बंद आहेत. काही बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आलेल्या मालाचे लिलाव केले आहेत. जिल्हा दूध संघाने जिल्ह्यातील दुधाचे संकलन बंद केले आहे. 
 
जादा दूध शेजाऱ्याला 
एरव्ही दूध संकलन केंद्रावर जाऊन दुधाची विक्री करणारा शेतकरी कालपासून ते दूध शेजाऱ्याच्या घरी नेऊन देऊ लागला आहे. काहीजण त्या दुधाचा खवा बनवू लागले आहेत. दुधाची नासाडी करण्यापेक्षा ते शेजाऱ्यांना देऊन दूध सत्कारणी लावत आहेत.