'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यास कोणी नाही तयार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

राज्य शासनाच्या आदेशानुसारच चिमणी पाडण्यासाठी निविदा काढली. त्यास पहिल्यावेळी प्रतिसाद मिळाला नाही. नियमानुसार तीनवेळेला मुदतवाढ दिली जाईल, तरीही प्रतिसाद न मिळाल्यास थेट कंपनीची शिफारस केली जाईल. 
- लक्ष्मण चलवादी, प्रभारी नगरअभियंता 

सोलापूर - येथील सिद्धेश्‍वर सहकारी कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी महापालिकेने 26 मे रोजी ई निविदा काढली होती. निविदा दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी एकही निविदा दाखल झाली नाही. दरम्यान, निविदा भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार आहे. तिसऱ्यावेळनंतरही प्रतिसाद मिळाला नाही, तर चिमणी पाडण्यासाठी महापालिका कंपनीची थेट शिफारस करणार आहे. 

सोलापूर विमानतळावरून विमान सेवा करण्यास सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य शासनानेच ही चिमणी तातडीने पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चिमणी पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. दरम्यान, हेलिपॅडच्या परिसरात उभारलेल्या खांबाला हेलिकॉप्टरचा पंखा लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉफ्टरला निलंग्यात दुर्घटना झाली आणि नगर अभियंता कार्यालयाने चिमणी पाडण्याची निविदा काढली. 

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध कारखाना व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने 12 जूनला म्हणणे मांडण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. चिमणी पाडकामाच्या आदेशाला स्थगिती देता येणार नाही, स्थगितीसाठी विमानतळ प्राधिकरणाकडे अपील करता येईल, असे न्यायालयाने कारखाना व्यवस्थापनास सांगितले आहे. तथापि 12 जूनला होणाऱ्या निर्णयानंतर पुढील धोरण ठरविले जाणार आहे. 

राज्य शासनाच्या आदेशानुसारच चिमणी पाडण्यासाठी निविदा काढली. त्यास पहिल्यावेळी प्रतिसाद मिळाला नाही. नियमानुसार तीनवेळेला मुदतवाढ दिली जाईल, तरीही प्रतिसाद न मिळाल्यास थेट कंपनीची शिफारस केली जाईल. 
- लक्ष्मण चलवादी, प्रभारी नगरअभियंता