सोलापूर: महापालिकेच्या पाणीपट्टीत वाढीचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

राज्यातील सिंचनाच्या पाणीपट्टीचे तसेच औद्योगिक व घरगुती पाणीपट्टीचे दर जून 2011 मध्ये निश्‍चित केले होते. त्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. दरम्यानच्या काळात महागाई वाढल्याने योजनांवरील देखभालीचा खर्च वाढला आहे.

सोलापूर : जलसंपदा विभागाने उजनी धरणातून महापालिका घेत असलेल्या घरगुती पाण्यासाठीच्या दरात 14.3 टक्के वाढ सुचविली आहे. त्यामुळे पाणीपट्टीत 50 टक्के कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याची वाट पाहणाऱ्या सोलापूरकरांना सवलत तर दूरच, उलट वाढीव पाणीपट्टीला सामोरे जावे लागणार आहे. या प्रस्तावामुळे महापालिकेवर प्रत्येक वर्षाला सरासरी दोन कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. 

सध्या पाणीपुरवठ्यावर 69 कोटी 65 लाख रुपये खर्च येतो. मात्र, उत्पन्न 62 कोटी 16 लाख रुपये अपेक्षित आहे. त्यामुळे सुमारे सात कोटी 49 लाख रुपयांचा तोटा आहे. अशा स्थितीत 50 टक्के पाणी सवलतीचा ठराव करण्यात आला आहे. मात्र, जलसंपदा विभागाने तयार केलेल्या प्रस्तावामुळे सवलत मिळण्याची शक्‍यता धुसर होणार असून, उलट पाणीपट्टी वाढीचा नवीन प्रस्ताव प्रशासनाकडून द्यावा लागणार आहे. 

राज्यातील सिंचनाच्या पाणीपट्टीचे तसेच औद्योगिक व घरगुती पाणीपट्टीचे दर जून 2011 मध्ये निश्‍चित केले होते. त्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. दरम्यानच्या काळात महागाई वाढल्याने योजनांवरील देखभालीचा खर्च वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर जलसंपदा विभागाने सध्याच्या पाणीपट्टीत वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती 1 ऑगस्टपासून जिल्हा, तालुका मुख्यालय तसेच जलसंपदा विभागाच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

उजनी धरणातून एप्रिल 16 ते एप्रिल 17 या कालावधीत पाच वेळा पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी उजनी धरणातून उपसा करून ते भीमानदी मार्गे येते. औज बंधाऱ्यात साठविलेले पाणी टाकळी-सोरेगाव योजनेमार्गे सोलापूर शहरात वितरीत केले जाते. याशिवाय उजनी ते सोलापूर बंदिस्त जलवाहिनीतूनही पाणीपुरवठा होतो. धक्कादायक बाब म्हणजे बंदिस्त योजनेतून घेण्यात येणाऱ्या पाण्याचे वार्षिक बिल फक्त दीड ते दोन कोटी येते, त्याचवेळी भीमा नदीमार्गे येणाऱ्या पाण्याचे बिल प्रत्येक वेळी साडेचार ते पाच कोटी रुपये येते. त्यात आता या दोन कोटींची भर पडणार आहे. 

भीमा नदीद्वारे घेण्यात आलेले पाणी व बिल 
कालावधी बिलाची रक्कम रुपयांत 
एप्रिल 2016 7,12,77,803 
मे 2016 87,88,800 
जुलै 2016 7,39,62,960 
एप्रिल 2017 10,94,27,063 
मे 2017 11,22,50,904