पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात काही प्रमाणात 50, 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात आहेत. यापैकी काही नोटांवर "बच्चो की बॅंक' आणि "पचास अंक' असे लिहिलेले असले तरी ही नोट हुबेहूब खऱ्या नोटेसारखी दिसते. शंभर आणि दोनशेच्या नोटांची पूर्णपणे नक्कल केली असून, त्या बॅंकेत किंवा दुकानांमधील मशिनमध्येच तपासल्यावर खोट्या असल्याचे दिसून येते.
दुकानदारालाही खोटी नोट नेमकी कोणी दिली, याची माहिती मिळत नाही. चौकशीचा ससेमिरा नको म्हणून नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, बनावट नोटांचा हा भूर्दंड सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. पोलिसांनीही अशा नोटा चलनात आणणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे.
लिंकरोड, चिंचवड येथील गणेश सुपर मार्केट या दुकानातील पन्नास रुपयांची नोट ग्राहकास दिली. मात्र, ती बनावट असल्याचे ग्राहकाने सांगितल्यावर त्याने आपल्या डोक्यावर हात मारून घेतला. ही नोट कोणी आणि कधी दिली याचा विचार तो करू लागला. सकाळच्या प्रतिनिधीने ती नोट घेऊन पाहिली. तेव्हा ती हुबेहूब पन्नास रुपयांच्या नोटेसारखी आणि रंगाची दिसून आली.
पन्नास आणि शंभर रुपयांची बनावट नोट सकाळच्या प्रतिनिधीच्या हाती लागली. त्यांनी ही नोट बाजारात चालते का, याबाबत आठ ठिकाणी स्टींग ऑपरेशन केले. तेव्हा सात ठिकाणी दुकानदाराने या नोटा स्वीकारल्या. मात्र, बनावट नोट असल्याचे सांगताच पुन्हा गल्ल्यातून ती नोट काढून पाहिली. तेव्हा त्याने कपाळावर हात मारून घेतला. जर नोटेवर बच्चो की बॅंक लिहिलेले असेल तर तो गुन्हा होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, बनावट नोटेमुळे नागरिकांची फसवणूक होते, हे मात्र खरे.
खऱ्या, खोट्या नोटेतील फरक
* खऱ्या नोटेतील सीरियल क्रमांक दिला तर बनावट नोटेवर केवळ शून्यांची सीरिअल आहे.
* खऱ्या नोटेवर पचास रुपये तर बनावट नोटेवर पचास अंक असे लिहिलेले आहे.
* खऱ्या नोटेवर चमकणारी तार स्पष्टपणे दिसते तर बनावट नोटेवर हिरव्या रंगाची रेषा आहे.
बनावट आणि खऱ्या नोटेतील साम्य
* दोन्ही नोटांचा आकार एक समान आहे
* दोन्ही नोटांची रंगसंगती एक आहे
* दोन्ही नोटांवर रु. 50 असे लिहिलेले आहे
गेल्या महिन्यात भोसरी पोलिसांनी बनावट नोट चलनात आणणाऱ्यांवर कारवाई केली आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा तक्रार आलेली नाही. जर कोणी बनावट नोट चलनात आणत असेल तर नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी.
- सतीश पाटील, सहायक आयुक्त-गुन्हे शाखा
|