Metro
Metro

खड्डे बुजविण्याची जबाबदारी महामेट्रोची

पुणे - वनाज- रामवाडी दरम्यान मेट्रो मार्गाच्या शेजारील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही महापालिकेने आपली जबाबदारी महामेट्रोवर ढकलली आहे. त्यामुळे आता मेट्रो मार्गाभोवतालच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महामेट्रोला काम करावे लागणार आहे. त्यानुसार महामेट्रोने पौड रस्त्यावर काम सुरू केले आहे.

वनाज- रामवाडी मेट्रो मार्गासाठी सध्या वनाज- डेक्कन कॉर्नरदरम्यान काम वेगात सुरू आहे. कर्वे रस्त्यावर मध्यभागी सुमारे 9 मीटर जागेत मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे तर, त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीसाठी सुमारे साडेसात मीटर रस्ता उपलब्ध आहे. या रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असून, कोंडीही होत आहे. याबाबत पौड रस्त्यावर महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पाहणी केली. त्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी महामेट्रोवर ढकलण्यात आली आहे.

दरम्यान, रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाला महामेट्रोने पौड रस्त्यापासून सुरवात केली आहे. या मार्गालगतच्या पदपथांच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकाच करणार आहे. पौड रस्त्यावर मेट्रो मार्ग उभारण्यासाठी दहा खांब पूर्ण झाले आहेत. या महिन्याच्या अखेरीस दहा खांबांचे काम पूर्ण होईल, असा विश्‍वास वनाज- रामवाडी मार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. खांब उभारल्यावर गर्डर टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नदीपात्रातील काम सध्या थांबविण्यात आले आहे. परंतु, पाऊस उघडला आणि धरणातून पाणी सोडण्यात येणार नसेल तर परिस्थितीचा आढावा घेऊन काम सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

"वनाज'कडून 150 मीटर जागा
वनाज येथे मेट्रोचे स्थानक होणार आहे. त्यासाठी वनाज कंपनीची सुमारे 150 चौरस मीटर जागेची महामेट्रोला आवश्‍यकता होती. त्याबाबत दोन दिवस चर्चा झाल्यावर कंपनीने जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्या जागेतील महावितरणचा ट्रान्सफार्मर हलविण्याची प्रक्रिया तूर्त सुरू झाली नसली तरी, काम सुरू करण्यास हरकत नसल्याचे वनाज कंपनीने कळविले आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com