लोणावळा-दौंड लोकल प्रवास होणार सुखकर

 लोणावळा-दौंड लोकल प्रवास होणार सुखकर

पिंपरी - तुम्ही जर नोकरी, व्यवसायानिमित्त लोणावळ्यावरून दौंड परिसरात जात असाल, तर आगामी काळात तुमचा हा प्रवास सोईस्कर होणार आहे. लोणावळा ते दौंड मार्गावर लोकलसेवा सुरू करणे शक्‍य असून, त्यासंदर्भातील सकारात्मक अहवाल मध्य रेल्वेने सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. येत्या काही दिवसांत बोर्डाने त्याला हिरवा कंदील दाखविल्यास प्रवाशांसाठी ते फायदेशीर ठरणार आहे. 

गेल्या काही वर्षांपासून शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. लोणावळा, तळेगावबरोबरच पिंपरी-चिंचवड परिसरातून मांजरी, उरुळी कांचन, दौंड या भागात अप-डाऊन करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. या प्रवाशांची त्यामुळे सोय होणार आहे. 

त्रास कमी होणार
सध्या लोणावळा, तळेगाव, पिंपरी-चिंचवड परिसरातून दौंडला जाणाऱ्यांना पुण्यातून दौंडला जाणारी पॅसेंजर किंवा डेमू गाडी पकडावी लागते. त्यात प्रवाशांचा वेळ खर्च होतो. काही वेळेला पुणे-लोणावळा लोकल किंवा दौंडला जाणाऱ्या पॅसेंजरला उशीर झाल्यास प्रवाशांना अडचण येते. लोणावळा ते दौंडदरम्यान थेट लोकलसेवा सुरू झाल्यानंतर हा त्रास कमी होणार आहे. 

कामे सुरू
पुण्याहून दौंडकडे जाणाऱ्या लोहमार्गावर रेल्वेकडून पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे काम वेगात सुरू आहे. या मार्गावरील पाटस, मांजरी, कडेठाण या रेल्वे स्टेशन परिसरात अडचण होती. ती दूर केली आहे. या मार्गावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविल्यामुळे येथे लोकलगाड्या थांबणे शक्‍य होणार आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाने लोणावळा ते दौंड लोकलला मान्यता दिली, तर पुणे-दौंड हा मार्ग उपनगरीय रेल्वे म्हणून जाहीर होऊ शकतो. 

१९९२ पासूनची मागणी
लोणावळा ते दौंड मार्गावर लोकलसेवा सुरू करण्याची मागणी अनेक प्रवासी संघटनांकडून १९९२ पासून करण्यात येत आहे. मात्र, आजतागायत ती मार्गी लागलेली नाही. पुणे ते दौंड मार्गावरील इलेक्‍ट्रिफिकेशनचे काम आता पूर्ण झाले आहे, त्यामुळे ही सेवा सुरू होऊ शकते. 

पुणे ते लोणावळा लोहमार्गावर ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नल सिस्टिम बसवण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत लोणावळा ते देहूरोडपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात चिंचवडपर्यंतच्या कामाला सुरवात होणार आहे. या नव्या यंत्रणेमुळे एका मागोमाग रेल्वे गाड्या सोडणे शक्‍य होत आहे. 
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग 

दोन वर्षांत सुविधा अपेक्षित
‘‘दौंड ते लोणावळादरम्यान लोकलसेवा सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. पुढील दोन वर्षांमध्ये ही सुविधा सुरू होणे अपेक्षित आहे. यामुळे प्रवासी आणि नागरिकांची सोय होणार आहे,’’ असे प्रवासी राहुल डांगे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com