पुणे, पिंपरीत 11 मार्गांवर मिनिटाला बस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

एक मिनिटाला बस उपलब्ध झालेले मार्ग : 
कात्रज- स्वारगेट, स्वारगेट-शिवाजीनगर, मनपा भवन-निगडी, औंध-डांगे चौक, येरवडा-खराडी बायपास रोड, महात्मा गांधी बसस्थानक-हडपसर, डेक्कन-वारजे माळवाडी, डेक्कन-कोथरूड डेपो, सिमला ऑफिस-हिंजवडी, कासारवाडी-भोसरी, संगमवाडी-विश्रांतवाडी. 

पुणे : शहर आणि पिंपरी चिंचवडमधील 11 मार्गांवर एक मिनिटाला तर 13 मार्गांवर दर 3 मिनिटांना प्रवाशांसाठी बस उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट गाठण्यात यश आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत आणि पीएमपीच्या उत्पन्नातही भरघोस वाढ झाली आहे. 'पीएमपी फास्ट'चा दावा पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. गर्दीच्या मार्गांवर बसची संख्या वाढल्यामुळे वारंवारिताही वाढली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून मुंडे यांना 30 सप्टेंबर रोजी सहा महिने होत आहेत. या कालावधीत पीएमपीमध्ये केलेल्या सुधारणा व भविष्याचे नियोजन आदींची माहिती मुंडे यांनी दिली. प्रवासीकेंद्रित निर्णय, शिस्त आणि त्याला कर्मचाऱ्यांनी दिलेली साथ, यामुळे पीएमपीच्या फेऱ्यांची संख्या वाढली आहे.

सध्या दररोज 11 लाख 40 ते 80 हजार प्रवासी आणि एक कोटी 60 लाख रुपयांचे उत्पन्न गाठण्यात आले आहे. मार्गावर सध्या दररोज सुमारे 1500 बस असून ऑक्‍टोबरमध्ये 1550 बस होतील, असेही त्यांनी सांगितले.

तोटा कमी करण्यासाठी ठेकेदारांपेक्षा पीएमपीच्या बसची वाहतूक वाढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. प्रवाशांच्या मागणीनुसार गोखलेनगर, कोथरूड-कोंढवा, अप्पर-कोथरूड, स्वारगेट-धायरी, मनपा-बालेवाडी, अप्पर-पुणे स्टेशन, स्वारगेट-कोंढणपूर, लेकटाऊन-शिवाजीनगर, निगडी-देहूगाव, भारती विद्यापीठ-पुणे स्टेशन, मोशी, लोहगाव आदीं मार्गांवर बस संख्या वाढल्या असून फेऱ्याही वाढल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ज्येष्ठांच्या पासची दरवाढ कमी करा 
पासच्या मासिक दरात पीएमपी प्रशासनाने नुकतीच दरवाढ केली आहे. त्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या पासची दरवाढ कमी करावी, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. त्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासच्या दरात 50 टक्के सवलत दिलेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

एक मिनिटाला बस उपलब्ध झालेले मार्ग : 
कात्रज- स्वारगेट, स्वारगेट-शिवाजीनगर, मनपा भवन-निगडी, औंध-डांगे चौक, येरवडा-खराडी बायपास रोड, महात्मा गांधी बसस्थानक-हडपसर, डेक्कन-वारजे माळवाडी, डेक्कन-कोथरूड डेपो, सिमला ऑफिस-हिंजवडी, कासारवाडी-भोसरी, संगमवाडी-विश्रांतवाडी. 

नव्याने सुरू झालेले 13 मार्ग : 
सुखसागर- खजिनाविहीर मार्गे सुखसागर-कोथरूड डेपो आंबिलओढा कॉलनीमार्गे, सुखसागर-कोंढवा गेट आंबीलओढा कॉलनीमार्गे, वारजे (घरकुल वसाहत)-पिंपळे गुरव, थेऊर-वाघोली, वाघोली-आळंदी, कोंढवा हॉस्पिटल-शिवाजीनगर गंगाधाम मार्गे, जांभूळवाडी-शिवाजीनगर, मंडई-गुजरवाडी, किवळे-निगडी, इंद्रायणीनगर- पुणे स्टेशन, चऱ्होलीगाव-निगडी, आकुर्डी (खंडोबा माळ) चिखली 

महिला स्पेशल बस : 
भोसरी- मनपा (फेऱ्या 2), निगडी- मनपा भवन (2), कात्रज-शिवाजीनगर (24), भेकराईनगर- मनपा (2), कात्रज- म. हौ. बोर्ड (2), वारजे माळवाडी-मनपा भवन (2), धनकवडी-नतावाडी डेपो (2) 

शटल सेवा : शनिवारवाडा-डीएसके, संतनगर-डांगे चौक 

  • 200 बस लवकरच येणार 
  • तेजस्विनी बस 31 मार्चपर्यंत घेणार 
  • पीएमपी ई-कनेक्‍ट ऍपवर तीन महिन्यांत 7 हजार तक्रारी, बहुतांश तक्रारींचे निवारण. 
  • दैनंदिन ब्रेकडाऊन सुमारे 300 वरून 150 वर आले 
  • 400 बंद बसपैकी 300 मार्गांवर 

आजपासून बस संख्या वाढलेले मार्ग :
भेकराईनगर-आळंदी, शेवाळवाडी-निगडी, शनिवारवाडा-नऱ्हेगाव (आंबेगाव), कोंढवा गेट- कोंढवा गेट, हडपसर-मांजरीमार्गे केशवनगर, हडपसर-मांजरी खुर्द 

धमक्‍यांना घाबरत नाही 
सलग आलेल्या धमक्‍यांच्या चार पत्रांबाबत मुंडे म्हणाले की, धमक्‍यांना मी कधीही घाबरलेलो नाही. माझे काम मी करत राहणार आहे. पोलिस त्यांचा तपास करतील. धमक्‍यांचा माझ्या कामावर परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: marathi news marathi websites Pune news PMC PMPML Tukaram Mundhe