आर्थिक दुर्बलांना आरक्षण हवेच - शरद पवार

आर्थिक दुर्बलांना आरक्षण हवेच - शरद पवार

पुणे : "दलित आणि आदिवासी या समाजांच्या आरक्षणाबद्दल कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही. अन्य घटकांच्या आरक्षणासाठी ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आरक्षणाबाबत माझी स्वच्छ भूमिका आहे. अन्य घटकांबाबत आरक्षणाचा निर्णय घेताना जातीनिहाय विचार करून नये. त्याऐवजी जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, तो कोणत्याही जातीचा असो, त्याला आरक्षण मिळाले पाहिजे,' अशा शब्दांत ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, दलित आणि आदिवासी आरक्षण कायम ठेवून, असेही ते म्हणाले. राज्यात विद्वेष वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना सर्व राजकीय पक्षांनी हे थांबवायला हवे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. 

जागतिक मराठी अकादमी आणि "बीव्हीजी' ग्रुपच्या वतीने बीएमसीसी मैदानावर बुधवारी आयोजित कार्यक्रमात पवार यांची मुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. या मुलाखतीबाबत राज्यभर उत्सुकता शिगेला पोचली होती. बीएमसीसीचे मैदानही तुडुंब भरले होते. दुपारी तीन वाजल्यापासून मुलाखतीच्या ठिकाणी गर्दी उसळली होती. सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळींबरोबरच पवार आणि ठाकरे कुटुंबीयदेखील आवर्जून उपस्थित होते. सुमारे एक तास 50 मिनिटे चाललेल्या या मुलाखतीमध्ये पवार यांच्या कॉलेज जीवनापासून ते आवडता नेता, कॉंग्रेस पक्ष सोडण्याची कारणे, आरक्षण, शेतकऱ्यांची आत्महत्या, बुलेट ट्रेन अशा विविध विषयांवर ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना पवारांनी दिलखुलास उत्तरे दिली. 

या बहुचर्चित मुलाखतीमधील काही ठळक मुद्दे : 
ठाकरे : खरं बोलल्याचा कधी त्रास झालाय का? 
पवार :
 राजकारणात खरं बोलणं गरजेचं असतं; पण अडचणीचं असेल तिथे न बोलणं बरं असतं... समाज किंवा व्यक्तीचं मन दुखवायचं नसेल तर कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. 

ठाकरे : यशवंतराव चव्हाणांच्या पिढीचं मूल्याधिष्ठित राजकारण आज दिसत नाही. त्याबद्दल... 
पवार :
 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रातील तरुणांचे आदर्श. समाजकारणात अथवा राजकारणात कुठेही जा; पण विनम्रता सोडू नका, ही शिकवण त्यांनी दिली. संस्कारच असे होत गेले, की आपण एका चौकटीबाहेर कधीही जाता कामा नये. संघर्ष झाला, पण चौकट सोडली नाही. आज व्यक्तिगत हल्ले करताना आपण कोणत्या पदावर आहोत, याचंही स्मरण होत नाही. यावेळच्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या आभाराच्या प्रस्तावावर गांधी-नेहरू घराण्यावर एवढा व्यक्तिगत हल्ला केला गेला. जवाहरलाल नेहरूंनी देशासाठी काहीच केलं नाही, हे विधान पटणारं नाही. वैचारिकदृष्ट्या मतभेद असले तरी दुसऱ्याच्या विचाराचं स्वागत, सन्मान करण्यात अटलबिहारी वाजपेयी यांनी आदर्श घालून दिला. तो आदर्श आजच्या सत्ताधाऱ्यांमध्ये दिसत नाही. 

ठाकरे : महाराष्ट्र देशाचा विचार करत आला. त्यामुळे महाराष्ट्राचा विचार झाला नाही. इतर राज्यांचे नेते असं करत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यांना अहमदाबादला नेतात. यात महाराष्ट्र आणि मराठीचं नुकसान होत नाही का? 
पवार :
 काही प्रमाणात हे खरे आहे. त्याची झळ बसते ही वस्तुस्थितीदेखील आहे; पण महाराष्ट्रासाठी देश नेहमीच मोठा राहिलाय. महाराष्ट्रातील नेत्यांनी नेहमीच ही भूमिका घेऊन काम केले. आज मात्र तसे होताना दिसत नाही. पंतप्रधानपदावर बसल्यानंतर तुम्ही देशाचे नेते आहात, हे लक्षात ठेवा. ही भावना आज प्रत्येक सदस्याची असली पाहिजे; परंतु ती आताच्या नेत्यांमध्ये दिसत नाही. 

ठाकरे : पण हे आपला शिष्य (नरेंद्र मोदी) ऐकतो का? 
पवार : 
मी कृषिमंत्री असताना नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातच्या विकासाचा सातत्याने विचार करणारे ते गृहस्थ होते; परंतु दिल्लीत मुख्यमंत्री परिषदेस आल्यावर ते आक्रमक असत. ते सतत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करायचे. ते कॉंग्रेसच्या कोणत्याही नेत्याला पटायचं नाही. त्यामुळे गुजरातचा कोणताही प्रस्ताव आला, तर त्यावर निर्णय घेण्यास ते टाळाटाळ करत; पण गुजरात हा देशाचा भाग आहे, हीच माझी भूमिका असायची. त्यामुळे मोदी यांना मी मदत करायचो. त्यामुळे दिल्लीत आले की ते माझ्या घरी यायचे. मी त्यांची कामे करून द्यायचो. मी पवारांची करंगळी धरून राजकारणात आलो, असं मोदी म्हणतात. पण त्यात तथ्य नाही. सुदैवाने माझी करंगळी कधीही त्यांच्या हातात सापडली नाही. व्यक्तिगत सलोखा आहे. 

ठाकरे : कॉंग्रेस-समाजवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी असं आत-बाहेर करताना मनात काय असायचं? 
पवार :
सार्वजनिक जीवनाची सुरवात ही कॉंग्रेसमधून झाली. नेहरू-गांधींची विचारधारा मी कधी सोडली नाही. मतभेद झाल्यामुळे कॉंग्रेस पक्ष सोडावा लागला. वाजपेयी सरकारने राजीनामा दिला, त्या वेळी संसदेतील विरोधी पक्षनेता म्हणून मी किंवा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मनमोहनसिंग यांना राष्ट्रपतींनी निमंत्रित करून सरकार स्थापनेबाबत विचारणा करायची असते; परंतु तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षांनी स्वत:च राष्ट्रपतींकडे जाऊन त्यांच्या वतीने सरकार स्थापनेचा दावा केला; ते मला आवडले नाही आणि तेव्हाच कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. 

ठाकरे : बाबरी मशीद पडल्यावर तुम्हाला मुंबईला पाठवण्यात आलं, त्या वेळी नरसिंहराव आणि तुमच्यात नेमकं काय झालं? 
पवार :
जगाचं लक्ष दिल्लीपेक्षा आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे अधिक असतं. मुंबई पेटल्याचं समजताच गुंतवणूक केलेल्या घटकांसाठी चिंतेची बाब निर्माण झाली. त्यामुळेच मला केंद्रातून राज्यात मुख्यमंत्री म्हणून जावे लागेल, असे नरसिंह राव यांनी सांगितले; पण मी तयार नव्हतो. महाराष्ट्राने एवढे काही तुम्हाला दिले, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रासाठी मुंबईत जावं असा आग्रह नरसिंहरावांनी धरला. त्यामुळं मी मुंबईत आलो. दिल्लीत बसूनही मी मुंबई शांत करू शकत होतो; परंतु तेव्हा सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते. मी तसे केले असते, तर मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांत हस्तक्षेप झाला असता आणि प्रशासनातही गोंधळ उडाला असता. त्यामुळे तसे न करता मी महाराष्ट्रात येणे पसंत केले. महाराष्ट्रातील नेतेमंडळी एका विशिष्ट मर्यादापलीकडे जाऊ नये, अशा विचारांची काही मंडळी दिल्लीत आहे. त्यांच्याकडून हे प्रयत्न कायम सुरू असतात. तेव्हाही तसे होते. 

ठाकरे : गिरणी कामगारांच्या प्रश्‍नांवर शिवाजी पार्कमध्ये एकत्र आलेले पवार, बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस पुढे एकत्र राहतील, असं वाटलं होतं का? 
पवार :
 बाळासाहेबांमध्ये दातृत्वाची भावना होती. बाळासाहेब आणि माझे संबंध चांगले होते, जॉर्ज फर्नांडिस व बाळासाहेबांचे संबंधही उत्तम होते. गिरणगाव बंद पडल्यास मुंबई थांबेल. मराठी माणसू संपेल. त्यामुळे गिरण्या सुरूच राहिल्या पाहिजेत, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. त्यामुळेच शिवाजी पार्कच्या सभेत आम्ही तिघे फक्त कामगारांच्या प्रश्नांवर एकत्र आलो. बाळासाहेबांना जी भीती वाटत होती, ती आज खरी झाल्याचे दिसते. गिरण्यांच्या जागेवर इमले उभे राहिले आहेत. 

ठाकरे : प्रत्येक महापुरुषाकडे जातीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय. जाती-जातीत जो कडवटपणा आलाय, तो कसा दूर होईल? 
पवार :
शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार, मराठी अस्मिता आणि राष्ट्राची अस्मिता अधिक बिंबवण्याची गरज आहे. आज सत्तेवर बसलेल्यांकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय. जाणीवपूर्वक अशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातंय. त्यातून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न आहे; पण हे फार दिवस टिकेल असं वाटत नाही. महाराष्ट्र या रस्त्याने जाणार नाही. तो शाहू-फुलेंच्या विचारानेच जाईल. 

ठाकरे : महाराष्ट्रात आधी गरिबी होती; पण शेतकरी आत्महत्या करत नव्हते. आज आत्महत्येचं प्रमाण का वाढतेय? 
पवार :
 केवळ कर्जमाफी हे उत्तर नाही, तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या मालाला भाव दिला तरच परिस्थिती बदलेल. कर्जबाजारीपणा हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं मुख्य कारण आहे. आम्ही 71 हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानं त्या काळात आत्महत्येचं प्रमाण घटलं. केवळ कर्जमाफी न देता त्यांना पतपुरवठादेखील केला. 

ठाकरे : वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, कन्नमवार असे तीन मुख्यमंत्री झाले असतानाही वेगळ्या विदर्भाची मागणी का होते? 
पवार :
 जनतेला या मुद्यावर काय वाटते, यासाठी जनमत चाचणी घ्यावी, अशी माझी सूचना आहे. तेथील सामान्य मराठी माणूस वेगळ्या स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने नाही. 

ठाकरे : बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई स्वतंत्र करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे का? 
पवार :
 अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईची गर्दी वाढणार आहे. इथून अहमदाबादमध्ये कोणी जाणार नाही; पण तिथूनच लोकं मुंबईत येतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. आर्थिक सत्ता ताब्यात मिळण्यासाठी ही धडपड सुरू आहे. बुलेट ट्रेनचा मार्ग बघतिला, तर वसई-विरार या भागात कधीही गुजराथी बोर्ड फारसे दिसत नव्हते. ते आता दिसत आहेत. त्यातून हे स्पष्ट होते. बुलेट ट्रेन करावयाची होती, तर मुंबई-दिल्ली या मार्गावर केली असती, मुंबई-नागपूर अशी केली असतील तर महाराष्ट्र त्यातून जोडला गेला असता. बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाला विरोध नाही. मात्र, तो ज्या पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यास विरोध आहे. 

ठाकरे : नरेंद्र मोदींबद्दल तुमचं आधी आणि आता नक्की काय मत काय? 
पवार :
नरेंद्र मोदींकडे कष्ट करण्याची वृत्ती आहे; परंतु एक राज्य चालवणे आणि देश चालवणं यात फरक असतो. देश चालवण्यासाठी टीम लागते. मोदींकडे टीमचा अभाव दिसतोय. त्यांच्या सहकाऱ्यांमध्येदेखील नेतृत्वाबाबत शंका आहे, हे देशासाठी योग्य नाही. 

ठाकरे : कॉंग्रेसचे भवितव्य काय आणि राहुल गांधींबद्दल तुमचे मत काय? 
पवार :
जुनी कॉंग्रेस आणि आजच्या कॉंग्रेसमध्ये फरक आहे. पूर्वी देशातील प्रत्येक राज्यात कॉंग्रेस पोचलली होती. स्वातंत्र्यासाठी योगदान देणारी आणि संसदीय लोकशाही या देशात उभी करणारी. आता मात्र अनेक राज्यांत कॉंग्रेस नाही. अनेक जिल्ह्यांत दुबळी झाली आहे. आज त्यांचे नेतृत्व करण्याचे आव्हान राहुल गांधी यांच्यापुढे आहे. मी पाच ते दहा वर्षांपासून त्यांना बघतो. आज त्यांची विषय समजून घेण्याची, देशाच्या विविध भागांत जाण्याची, तिथल्या जाणकारांशी सुसंवाद करण्याची आणि शिकण्याची तयारी आहे. आज सगळे छोटे पक्ष आहेत. भाजपला पर्याय देण्याची ताकद केवळ एकमेव कॉंग्रेस पक्षामध्ये आहे. 

ठाकरे : महाराष्ट्रापुढील कोणता प्रश्‍न तुम्हाला चिंतेत टाकतो? 
पवार :
महाराष्ट्राचे सामाजिक आणि जातीय ऐक्‍य हा प्रश्‍न चिंतेचा वाटतो. विद्वेष वाढतो आहे. हा विद्वेष समाजात आणि घटका-घटकांमध्ये तो वाढताना दिसतो. काही गोष्टी अशा आहेत, की राजकीय अभिनवेश बाजूला ठेवून काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. माणसा-माणसांमध्ये, तरुणांमध्ये जात-धर्म, भाषांमधील कटूता काही करून घालविली पाहिजे. ऐक्‍य निर्माण करण्याच्या दृष्टीने पावले टाकली पाहिजेत. राजकीय पक्षांनी त्यांचा अजेंडा राखून विद्वेष वाढणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. 
ठाकरे : कोणता नेता जो गेल्यानंतर तुमच्या मनाला चटका लावून गेला. 
पवार : राजकीय विचारात असेल, तर माझ्या अत्यंत जवळचे म्हणजे यशवंतराव चव्हाण... आणि दुसरे म्हणजे देशाचा आणि राज्याचा अखंड विचार करणारे बाळासाहेब ठाकरे... हे गेल्यानंतर अत्यंत अस्वस्थ वाटले. 

ठाकरे : अशी कोणती एखादी घटना आहे, जी बदलता आली असती, तर बरे वाटले असते. 
पवार :
 चार वेळा मुख्यमंत्री होतो. पन्नास वर्षे लोकांनी सतत निवडून दिले. हे भाग्य सहजासहजी कोणाला मिळत नाही. अजूनही मी महाराष्ट्रात फिरतो, मला गरिबी दिसते, महिलांवरील अत्याचार दिसतात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसतात आणि समाज बघ्याची भूमिका घेतो, या सर्व गोष्टी मला अस्वस्थ करतात. या सगळ्यांना न्याय कसा देता येईल, यासाठी जगले पाहिजे. त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे होते, ते देऊ शकले नाही. याची खंत वाटते. त्यासाठी नवी सक्षम पिढी घडवली पाहिजे. 

रॅपिड फायर प्रश्‍न 
राज ठाकरे : यशवंतराव चव्हाण की इंदिरा गांधी 
शरद पवार : एका वाक्‍यात उत्तर देता येणार नाही. दोघांमध्ये काही गोष्टी कॉमन होत्या. 
राज ठाकरे ः शेतकरी की उद्योगपती 
शरद पवार : शेतकरी 
राज ठाकरे ः अमराठी उद्योगपती की मराठी उद्योगपती 
शरद पवार : उद्योगपती 
राज ठाकरे : दिल्ली की महाराष्ट्र 
शरद पवार : अडचणीचा प्रश्‍न आहे; पण दिल्ली. महाराष्ट्र घडण्यासाठी दिल्ली हातात पाहिजे. 
राज ठाकरे : कॉंग्रेस की भाजप 
शरद पवार : कॉंग्रेस 
राज ठाकरे : राज की उद्धव 
शरद पवार : ठाकरे कुटुंबीय 

दाऊदचा मुद्दा आला कोठून? 
पवार यांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक आरोप त्यांच्यावर झाले. त्यावर ठाकरे यांनी "आजपर्यंत विविध आरोप झाल्यानंतरही तुम्ही त्याचे स्पष्टीकरण देत नाहीत,' असे पवार यांना विचारले. त्यावर पवार म्हणाले, ""मी अशा आरोपांना कधी महत्त्व देत नाही. तथ्य नसेल, तर काही चिंता करण्याची गरज नाही. लातूरचा भूकंप माझ्यामुळे झाला, एवढाच आरोप माझ्यावर झाला नाही. दाऊदशी संबंध असल्याबाबतचा आरोपदेखील अशा प्रकारे झाला होता. त्याचा खुलासा करण्यापेक्षा मी त्याच्या खोलात गेलो. एका पत्रकाराने दुबईत दाऊदच्या भावाची मुलाखत घेतली. त्यामध्ये शरद पवार यांना ओळखता का, असा प्रश्‍न त्याने विचारला. त्यावर दाऊदच्या भावाने त्यांना कोण ओळखत नाही, असे उत्तर दिले. त्याची बातमी झाली आणि त्यानंतर संसदेत राम नाईक यांनी हा मुद्दा उचलून धरला. विरोधकांना तो इश्‍यू मोठा करावयाचा होता; पण त्याचे पुढे काही झाले नाही. 

महाराष्ट्राला एकत्र आणणारे नाव शिवाजी महाराज 
बंगालमध्ये टागोरांचे नाव येताच सर्व बंगाली एकत्र येतात; प्रत्येक राज्यात अशी व्यक्तिमत्त्वे आहेत. महाराष्ट्राला एकत्र आणू शकेल असे काय आहे, असे ठाकरे यांनी विचारताच "छत्रपती शिवाजी महाराज' असे उत्तर पवार यांनी दिले. "मग तुम्ही शाहू व फुलेंचा महाराष्ट्र म्हणता; पण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र का म्हणत नाही,' या दुसऱ्या प्रश्‍नाला उत्तर देताना पवार म्हणाले, ""महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा आहे. ते वेगळे सांगण्याची गरज नाही; परंतु शाहू, फुले, आंबेडकरांनी महाराष्ट्राला एक केलं. जात, पात, धर्म विसरून राज्याला एकत्र करणारे ते नेते होते. आज त्याच विचारांची गरज आहे. महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचाच आहे, त्याबद्दल कोणालाही शंका नाही. महाराष्ट्र मजबूत ठेवला पाहिजे. जात, धर्म, पंथ विसरून सर्व राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.'' 

**********************************************

शरद पवार यांची 'राज'कीय मुलाखत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com