पिंपरीत म्हाडाची ८५० घरे (व्हिडिओ)

पिंपरी गाव - म्हाडा गृहप्रकल्पाचे सुरू असलेले काम.
पिंपरी गाव - म्हाडा गृहप्रकल्पाचे सुरू असलेले काम.

पिंपरी - तुम्ही जर हिंजवडी किंवा तळवडे आयटी पार्कमध्ये काम करत आहात आणि महाराष्ट्राचे रहिवासी असाल, तर तुम्हाला परवडणारे घर घेण्याची संधी लवकरच मिळणार आहे. म्हाडाकडून लवकरच सुमारे ८५० घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, महिनाअखेरीस या प्रक्रियेला सुरवात होणार आहे. म्हाडासाठी वेगवेगळ्या बांधकाम व्यावसायिकांकडे आरक्षित असलेली ही घरे असतील.

नोकरी- व्यवसायानिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागांतून याठिकाणी स्थायिक झालेले नागरिक म्हाडाच्या घरांना प्राधान्य देत आहेत. अन्य बांधकामांच्या तुलनेत म्हाडाच्या घरांच्या किमती कमी असतात, त्यामुळे घरांसाठी निघणाऱ्या लॉटरी प्रक्रियेत सहभागी होणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ही नवीन घरे मोशी, वाकड, पुनावळे, चिखली, आळंदी, मोशी, पुनावळे, डुडुळगाव या परिसरात असतील. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांना वाकड परिसरात घर घेता येणार आहे, तर तळवडे परिसरात काम करणाऱ्यांना चिखली, मोशी या भागामध्ये घर घेण्याची संधी असेल. 

ताथवड्यात १५०० घरांची योजना
म्हाडाने ताथवडे परिसरात सुमारे अकरा एकर जागेवर गृहप्रकल्प उभारण्याची योजना हाती घेतली आहे. याठिकाणी विविध उत्पन्न गटांतील सुमारे दीड हजार घरे बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या सहा महिन्यांत कामाला सुरवात होईल. 

पिंपरीतील प्रकल्पाचे काम वेगात 
पिंपरी गावामध्ये म्हाडाने विविध उत्पन्न गटांसाठी एक हजार ३०९ घरे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. याचे काम वेगात सुरू आहे. या घरांसाठीही लवकरच लॉटरी काढण्यात येणार आहे. मिलिटरी डेअरी फार्मजवळ दहा एकर जागेमध्ये हा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. त्याठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी ३४०, मध्यम उत्पन्न गटासाठी ५९५ आणि अल्प उत्पन्न गटासाठी ३०८ घरे उपलब्ध असतील. येथील इमारती २२ मजली असतील. 

नियमांमध्ये बदल होण्याची शक्‍यता
म्हाडाच्या घरांसाठी नियमांमध्ये बदल होण्याची शक्‍यता आहे. अर्ज करताना नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. या नव्या नियमांचा अंतर्भाव करण्याबाबत विचार सुरू आहे.

म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर मिळाल्यानंतर कागदपत्रे देण्यात विलंब होतो, त्यामुळे प्रक्रिया अडकून पडते. त्याचा विचार करून जुन्या नियमांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहोत. लॉटरी प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने मोबाईल आणि ई-मेल वापर करणे अनिवार्य आहे. म्हाडाकडून संबंधितांना याच माध्यमातून माहिती कळवण्यात येणार आहे. 
- अशोक पाटील, मुख्य अधिकारी, म्हाडा, पुणे

म्हाडाच्या लॉटरीमधून सर्वसामान्यांना उपलब्ध होत असणाऱ्या घरांना चांगली मागणी आहे. मागणीचा विचार करता परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्याची आवश्‍यकता आहे. 
- रवींद्र पवार, नागरिक, वाकड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com