भुयारी मेट्रोचे काम महिन्यात 

भुयारी मेट्रोचे काम महिन्यात 

पुणे  - पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गातील कृषी महाविद्यालय ते फडके हौद आणि फडके हौद ते स्वारगेटदरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गाच्या निविदा एक महिन्यात मंजूर होणार असल्याचे महामेट्रोकडून मंगळवारी सांगण्यात आले. भुयारी मेट्रोसाठी सुमारे 250 कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी तीन पर्याय तयार केले आहेत. प्रत्येक कुटुंबाशी चर्चा करूनच या बाबतचा प्रश्‍न सोडविला जाणार असल्याची ग्वाही महामेट्रोतर्फे देण्यात आली. 

शिवाजीनगर-स्वारगेट दरम्यान भुयारी मेट्रो कामाच्या दोन निविदा तयार केल्या आहेत. त्या मंजूर झाल्यावर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात थेट कामाला सुरवात होईल. सुमारे तीन वर्षे हे काम चालणार आहे, असे महामेट्रोच्या भुयारी मार्गाचे प्रकल्प संचालक प्रमोद आहुजा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

प्रत्येक कुटुंबाशी चर्चा होणार 
भुयारी मेट्रोचा मार्ग आणि स्थानकांसाठी फडके हौद परिसरातील 250 कुटुंबे आणि 25 व्यावसायिकांचे स्थलांतर करावे लागणार आहे. मेट्रो मार्गाची अलाइनमेंट निश्‍चित झाली आहे. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. कसबा पेठेतील महापालिकेच्या एका शाळेच्या जमिनीवर इमारत उभारून या कुटुंबांचे स्थलांतर करता येऊ शकते. रोख मोबदला किंवा शहराच्या अन्य भागांत त्यांना जागा उपलब्ध करून देणे, हे पर्याय निश्‍चित केले आहेत. त्यानुसार भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असेही आहुजा यांनी स्पष्ट केले. या पर्यायांबाबत नागरिक सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शिवाजीनगर स्थानकाचे स्थलांतर 
शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या जागी बहुमजली संकुल होणार आहे. त्यात तळमजल्यावर आणि त्या खाली मेट्रोचे स्थानक असेल. उर्वरित जागेवर एसटीचे संकुल असेल. पुनर्विकासाचा प्रकल्प एसटी महामंडळ राबविणार आहे. दरम्यानच्या काळात एसटी स्थानकाचे मुळा रस्ता किंवा संगमवाडीमध्ये स्थलांतर होईल. जागा निश्‍चित झाल्यावर या कामाला सुरवात होणार आहे. 

भुयारी मार्ग 
- कृषी महाविद्यालय ते फडके हौद - अंतर 2.91 किमी 
- फडके हौद ते स्वारगेट - अंतर 2.73 किमी 

भुयारी स्थानके 
- शिवाजीनगर, शिवाजीनगर न्यायालय, फडके हौद, मंडई आणि स्वारगेट 
- मेट्रोमार्ग जमिनीपासून सरासरी 18 मीटरवर, तर स्थानके 19 ते 24 मीटर खोलवर असतील 
- भुयारी मेट्रोचा बोगदा - सुमारे 30 मीटर रुंद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com