कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात दुप्पट वाढ

pcmc
pcmc

पिंपरी - महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत कुशल, अर्धकुशल, अकुशल व शिकाऊ कामगारांसह सफाई कामगारांच्या मूळ वेतनात जवळपास दुपटीने वाढ केली आहे. दसरा व दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर वेतनवाढ झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मूळ वेतन आणि विशेष भत्ता मिळून त्यांना एक जुलैपासून ३१ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी किमान वेतन दिले जाणार आहे. याबाबत कामगार कल्याण विभागाने महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना कळविले आहे. 

श्रम व रोजगार मंत्रालयाच्या आदेशानुसार महापालिकेला कुशल, अर्धकुशल, अकुशल व कंत्राटी कामगारांचे किमान वेतन दरवर्षी निश्‍चित करावे लागते. त्यानुसार, पालिकेच्या विविध विभागांत कार्यरत व ठेकेदारातर्फे कंत्राटी पद्धतीने नियुक्त कामगारांचे किमान वेतन निश्‍चित करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कामगार कल्याण विभागाला दिला होता.

त्यानुसार, महापालिका व कंत्राटदारांतर्फे नियुक्त कामगारांचे किमान वेतन आणि दर सहा महिन्यांनी द्याव्या लागणाऱ्या विशेष भत्त्याचे दर कामगार कल्याण विभागाने निश्‍चित केले. यात जून महिन्यात सुधारणा केली. सुधारित दर एक जुलैपासून लागू झाल्याचे सर्व विभाग प्रमुखांना कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी कळविले आहे. 

महिन्याचे मूळ वेतन व विशेष भत्ता मिळून कंत्राटी कामगारांना मिळणाऱ्या एकत्रित रकमेबरोबरच अन्य भत्तेही मिळणार आहेत. त्यापटीत घरभाडे भत्ता, पीएफ, ईएसआय, बोनस, रजा वेतन, कामगार कल्याण निधी, सेवाशुल्काची रक्कमही मिळणार आहे. महापालिकेत दोन हजार ६३३ कंत्राटी कामगार असून कुशल, अर्धकुशल, अकुशल व शिकाऊ कामगारांना तीन हजार ६०५ रुपये व सफाई कामगारांना एक हजार ४९६ रुपये विशेष भत्ता दिला जाणार आहे.

वेतनवाढीच्या निर्णयाचे स्वागत करतो. पालिकेने कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. तणावमुक्त वातावरणात त्यांना काम करता आले पाहिजे. सफाई कामगारांना दर महिन्याच्या एक तारखेलाच पगार मिळावा. 
- ॲड. सागर चरण, उपाध्यक्ष, आरोग्य तक्रार निवारण समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com