नाल्यांमुळे ‘पवना’ प्रदूषित

चिंचवड - एसकेएफ कंपनीसमोरील नाल्याचे संग्रहित छायाचित्र.
चिंचवड - एसकेएफ कंपनीसमोरील नाल्याचे संग्रहित छायाचित्र.

पिंपरी - पवना नदीला मिळणाऱ्या नाल्यांमुळे पवनेच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष महापालिका पर्यावरण (२०१७-१८) अहवालातून समोर आला आहे. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या नाल्यातील पाणी नमुन्याचे परीक्षण केल्यानंतर पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे (डीओ) प्रमाण कमी होत असल्याचे आढळले आहे. तुलनात्मकदृष्ट्या रासायनिक (सीओडी) आणि जैविक प्राणवायूचे (बीओडी) प्रमाण दुपटीने वाढले आहे. त्यामुळे पाणी प्रदूषणात लक्षणीय वाढ होत आहे.

पवना नदीला मिळणाऱ्या एसकेएफ, सॅंडविक, मामुर्डी, गरवारे आणि कुकी आदी नाल्यांच्या पाणी नमुन्याचे २१ ठिकाणी परीक्षण करण्यात आले. मे व ऑगस्ट २०१७ आणि जानेवारी २०१८ या तीन महिन्यांत ते झाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निश्‍चित मानांकाच्या तुलनेत संबंधित नाल्यांमध्ये उन्हाळ्याच्या कालावधीत रासायनिक आणि जैविक प्राणवायूच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाल्याचे आढळले आहे. परिणामी, पवनेच्या प्रदूषणातही वाढ झाली आहे. 

पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूसाठी (डीओ) २ मिलिग्रॅम लिटर एवढे प्रमाण अपेक्षित आहे. तुलनेत मे-२०१७च्या परीक्षणानुसार ही पातळी मानांकापेक्षा कमी असल्याचे आढळले आहे. एसकेएफ नाला, यमुनानगर (०.४), सॅंडविक नाला, भोसरी (०.६), मामुर्डी नाला, विकासनगर (०.८), कुकी नाला, मोहननगर (०.२) आदी नाल्यांबाबत ही परिस्थिती आहे. 

पवना नदीपात्रातील पाणी नमुन्यांचेदेखील मे, ऑगस्ट २०१७ आणि जानेवारी २०१८ अशा तीन महिन्यांमध्ये परीक्षण करण्यात आले. त्यामध्ये पिंपरीगाव नवीन पुलाजवळ (११३), दापोडी हॅरिस पुलाजवळ (१०९) आणि गणपती विसर्जन जाधव घाट (१०९) येथील पाण्यामध्ये रासायनिक प्राणवायूचे प्रमाण जास्त आढळले आहे.

पवना नदी दृष्टिक्षेपात 
 शहरातील लांबी : २४ किलोमीटर
 नदीचा मार्ग : देहू, चिंचवड, पिंपरी, सांगवीजवळ मुळा नदीशी संगम 
 सर्वाधिक प्रदूषित नाले : मामुर्डी नाला (देहूरोड बाजार, विकासनगर), कुकी नाला (मोहननगर, चिंचवड)
 रासायनिक प्राणवायूचे मानांक (सीओडी) : १५० मिलिग्रॅम लिटर
 मानांकाच्या दुप्पट वाढ : मे- २०१७ : सॅंडविक नाला (३४३), मामुर्डी नाला (५०२), कुकी नाला (३८१)

उद्योगांतून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांनी मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर नाल्यांमध्ये मिळणाऱ्या रासायनिक सांडपाण्याचा प्रश्‍न सुटेल. शहरात ज्या भागांमध्ये सांडपाणीवाहिनी नाही तेथे ती टाकण्याचे काम महापालिका जलनिस्सारण विभागातर्फे सुरू आहे. 
- संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता (पर्यावरण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com