पिंपरीच्या औद्योगिक परिसरातील वीजपुरवठा अखेर सुरळीत

पिंपरीच्या औद्योगिक परिसरातील वीजपुरवठा अखेर सुरळीत

पिंपरी - मॉन्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे; तसेच वीजयंत्रणेतील बदल व सुधारणांमुळे कुदळवाडी, ज्योतिबानगर, रुपीनगर, तळवडे, भोसरी एमआयडीसीमधील टी ब्लॉक, सेक्‍टर 10 या ठिकाणी सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा सुरू आहे.

देखभाल व दुरुस्तीची कामे केली नसल्याने वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याची माहिती चुकीची असून उद्योगांच्या वीजविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणकडून 24x7 सेवा देण्यात आहे. यासाठी स्वतंत्र वाहन व तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे महावितरणकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.

भोसरी विभागाअंतर्गत एकूण 22 वीजवाहिन्यांद्वारे कुदळवाडी, ज्योतिबानगर, रुपीनगर, तळवडे; तसेच भोसरी एमआयडीसीला वीजपुरवठा होतो. या सर्व वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वीच केली आहेत. यामध्ये रोहित्राची तपासणी, त्याचे अर्थिंग व टर्मीनल कनेक्‍शन चेक करणे, ऑइलची पातळी कायम ठेवणे, फीडर पिलरची दुरुस्ती करणे, तारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई, डिस्ट्रीब्युशन बॉक्‍समधील फ्यूज बदलणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, गंजलेले वीजखांब बदलणे, तारांमध्ये स्पेसर्स बसविणे, इन्सूलेटर बदलणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फीडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे; तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फीडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे आदी कामांचा समावेश आहे. यासोबतच उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, अर्थिंग, पॉवर टॉन्सफॉर्मरचे ऑइल फिल्टरेशन, रिले टेस्टिंग, ग्रिसिंग, इन्सूलेटर क्‍लिनिंग आदी कामे करण्यात आली आहेत.

याशिवाय ज्योतिबानगर, रुपीनगर, तळवडे परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या 22 केव्ही यमुनानगर वीजवाहिनीचे विभाजन करण्यात आले. त्यावरील काही वीजभार हा बजाज वीजवाहिनीवर देण्यात आला आहे; तसेच नवीन 22/22 इंद्रायणी स्विचिंग स्टेशनमधून 22 केव्ही तळवडे वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आल्याने तळवडे परिसरातसुद्धा वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने होत आहे. भोसरी उपविभागातील 22 केव्ही पवना वाहिनीचे विभाजन करण्यात आले आहे. नवीन 22 केव्ही प्रियदर्शनी वाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे; तसेच सेक्‍टर 7 मध्ये 500 मीटर केबल टाकून वाहिनी क्र.1 चा वीजभार कमी करण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळेच भोसरीत 40 तास वीज खंडित
मॉन्सूनपूर्व तसेच नियमित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. गेल्या 1 ते 18 जुलैदरम्यान ज्योतिबानगर, रुपीनगर व तळवडे परिसरात तांत्रिक बिघाडांमुळे तीन वेगवेगळ्या कालावधीत एकूण 2 तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. भोसरी एमआयडीसीमधील 14 पैकी एकूण 9 वीजवाहिन्यांद्वारे होणारा वीजपुरवठा 1 ते 18 जुलैदरम्यान मुसळधार पाऊस; तसेच इतर तांत्रिक बिघाडांमुळे वेगवेगळ्या कालावधीत एकूण 40 तास खंडित होता, ही वस्तुस्थिती असल्याचेही महावितरणने प्रसिद्धिपत्रात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com